स्थगिती सरकार गेल्यानंतर महाराष्ट्रात गती आणि प्रगतीचं सरकार आलं; उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
16-Oct-2024
Total Views |
मुंबई : स्थगिती सरकार गेल्यानंतर महाराष्ट्रात गती आणि प्रगतीचं सरकार आलं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. बुधवारी पार पडलेल्या महायूतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महायूती सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच सरकारच्या कामांचे एक रिपोर्ट कार्डही सादर केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "निवडणूकींचा शंखनाद झाला आहे. महायूतीने दोन वर्षात जे काही काम केलं त्याचं एक रिपोर्ट कार्ड आम्ही सादर करत आहोत. स्थगिती सरकार गेल्यानंतर गती आणि प्रगतीचं सरकार महाराष्ट्राने दोन वर्षांत बघितलं आहे. ज्या वेगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात परिवर्तन करणाऱ्या योजना आणल्या त्या निश्चितपणे आमच्या कामाची गती सांगणाऱ्या आहेत. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्याने शेती वीजेकरिता स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या अंतर्गत सौर उर्जेच्या माध्यमातून १४ हजार मेगावॅट वीज निर्मितीचं काम सुरु केलं. पुढच्या १५ ते १८ महिन्यात हे काम पूर्ण होईल आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३६५ दिवस दिवसा वीज आम्ही उपलब्ध करून देऊ. साडेआठ रुपयाला पडणारी वीज आता तीन रूपये पडणार आहे. त्यामुळे सरकारचे दहा हजार कोटी रूपये वाचवणार आहोत. अतिशय विचारपूर्वक आणि पुढचे वर्षानुवर्षे चालेल अशी व्यवस्था करून आम्ही हा निर्णय घेतला आहे."
"तसेच शेतकऱ्यांना मागेल त्याला सौरपंप योजना आम्ही आणली आहे. सिंचनाच्या क्षेत्रातसुद्धा या सरकारने अभूतपूर्व काम केलं आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने एकाही प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली नाही. त्यामुळे सिंचनाचे काम पूर्णपणे ठप्प होते. आमच्या सरकारने १४५ प्रकल्पांना मान्यता दिली आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व दुष्काळी भागांमध्ये या कामाची सुरुवात झाली आहे. यासोबतच अशक्यप्राय वाटणारं नदीजोड प्रकल्पाचं कामसुद्धा आम्ही सुरु केलं आहे. आम्ही वेगवेगळ्या समाजांचे महामंडळ तयार केलेत. त्याचवेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून १ लाखांपेक्षा अधिक मराठा तरूणांना उद्योजक करण्याचं काम केलं. या सरकारने पहिल्यांदाच पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांचासुद्धा विचार केला आहे," अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.