मुंबई : काँग्रेस पक्षाचे नेते लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी कोर्टात पोहोचले आहेत. उद्धव ठाकरेंनीही महायूतीच्या सर्व योजना बंद करण्याची घोषणा केली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. बुधवार, १६ ऑक्टोबर रोजी महायूतीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आमचा विरोधी पक्ष लाडकी बहिण योजनेचे पैसे कुठून देणार, अशी टीका करतो आणि दुसरीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही १५०० रुपयांचे २००० रुपये देऊ असे त्यांचे नेते म्हणतात. त्यामुळे सरकारकडे या योजना चालवायला पैसे आहेत की, नाही हे त्यांनी ठरवायला हवं. आम्ही प्रत्येकाच्या पाठीशी पुर्ण आर्थिक पाठबळ उभं करूनच योजना जाहीर करू. पण विरोधी पक्ष मात्र, संभ्रमित दिसत आहेत. एकीकडे ते म्हणतात बजेटमध्ये पैसे नाहीत आणि दुसरीकडे वेगवेगळ्या योजना जाहीर करत आहेत. त्यामुळे त्यांचा पर्दाफाश होताना दिसतोय."
हे वाचलंत का? - आमदार विक्रम काळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट!
"काँग्रेस पक्षाचे नेते लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी कोर्टात पोहोचले आहेत. उद्धव ठाकरेंनी तर जाहीर सभेत आमचं सरकार आल्यावर महायूती सरकारच्या सर्व योजना आम्ही बंद करू, असं जाहीर केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्थगिती सरकार आणून महाराष्ट्राला कुलूपबंद करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण तो कधीही यशस्वी होणार नाही. विरोधक अनेक आरोप करतात पण कायदा सुव्यवस्थेवर बोलताना त्यांनी आरशात पाहायला हवं. ज्यांचा गृहमंत्रीच तुरुंगात गेला ते आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल सांगत आहेत," अशी टीकाही त्यांनी केली.