मुंबई : भविष्यात लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मदतीत आणखी वाढ होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. बुधवारी महायूतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महायूती सरकारने केलेल्या कामांचं रिपोर्ट कार्ड २०२२ सादर केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "आम्ही वेगवेगळ्या योजना जाहीर केल्यानंतर राज्याची तिजोरी मोकळी केली, कर्जबाजारी केलं जाईल, असं सातत्याने आमच्याबद्दल सांगितलं जातं. आम्ही अर्थसंकल्पात फार विचारपूर्वक योजना जाहीर केल्या. पण त्यावरही टीका करण्यात आली. मात्र, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना खूप प्रसिद्ध झाली असून महिलांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. या योजनेविरोधात काहीही तारतम्य नसलेल्या टीका करण्यात आल्या."
हे वाचलंत का? - लाडक्या बहिणींना देवेंद्र फडणवीसांचा मोलाचा सल्ला, "काँग्रेसी नेते योजनेविरोधात कोर्टात गेलेत...!"
"आम्ही जनतेचं जीवन बदलणाऱ्या योजना दिलेल्या आहेत. या योजनांना मिळणारा प्रतिसाद बघून विरोधक काहीसे गडबडले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या यशामुळे ते गडबडून गेलेत. आम्ही ही योजना जाहीर केल्यानंतर त्यांनी यावर प्रचंड टीका केली. परंतू, अडीच कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. आमच्या बहिणींच्या आयुष्यात होत असलेला सकारात्मक बदल विरोधकांना पचनी पडत नसल्याने हे पैसे फक्त निवडणूक होईपर्यंत मिळतील, असे ते सांगत आहेत. परंतू, या योजनेसाठी एकूण ४५ हजार कोटींची वर्षभराची तरतूद केली आहे. त्यामुळे ही योजना तात्पूरती नाही. हे पैसे तुमचा अधिकार आहे. कुणीही ते काढून घेऊ शकत नाही. भविष्यात या योजनेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मदतीत आणखी वाढ करण्याचा विचार आम्ही करत आहोत," असे त्यांनी सांगितले.