मुंबई : मंजुलिका परत येत आहे आणि यावेळी एक नाही तर दोन मंजुलिका असणार आहेत. हो सध्या कार्तिक आर्यन याची प्रमुख भूमिका असणारा 'भूल भूलैय्या ३' सध्या चर्चेत आहे. भूल भूलैय्या ३ चित्रपटाच्या ट्रेलरमधून १५ वर्षांनी पुन्हा एकदा वेगळं कथानक दिसणार असं दिसत आहे. विशेष म्हणजे भूल भूलैय्या नंतर तिसऱ्या भागात पुन्हा एकदा विद्या बालन दिसणार असून प्रेक्षक अधिकच उत्सुक आहेत. अशातच 'भूल भूलैय्या ३'मध्ये आधीच्या भागातील एक पात्र पुन्हा एन्ट्री घेताना दिसणार आहे.
कार्तिक आर्यनने मीडियाशी संवाद साधताना नकळतपणे एक नाव घेतलं आहे. कार्तिक म्हणाला की, "भूल भूलैय्या ३ चे दोन क्लायमॅक्स होते. त्यापैकी आम्हाला फक्त एका क्लायमॅक्सची स्क्रीप्ट देण्यात आली होती. स्क्रीप्टमधली शेवटची १५ पानं गायब होती. केवळ आमच्याकडेच नाही तर चित्रपटाचे असिस्टंट डायरेक्टर, प्रॉडक्शन डिपार्टमेंट सर्वांकडे अशीच स्क्रीप्ट गेली होती. इतकंच नव्हे तर आम्ही कियारासोबत शूट करत होतो." असं म्हणताच कार्तिक गडबडला आणि त्याने लगेच कियाराचं नाव बदलून विद्या बालनचं नाव घेतलं. अशाप्रकारे कार्तिकने नंतर त्याचं बोलणं सावरलं असलं तरीही 'भूल भूलैय्या ३'मध्ये कियारा अडवाणी पुन्हा दिसणार असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. कियारा कार्तिकसोबत 'भूल भूलैय्या २'मध्ये झळकली होती.
'भूल भूलैय्या ३' १ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'शी भिडणार आहे. २००७ साली अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'भूल भुलैय्या'चा हा तिसरा भाग आहे. आता तिसऱ्या भागात विद्या बालनने कमबॅक केलं असून माधुरी दीक्षित पहिल्यांदाच भयपटात दिसणार आहे. दरम्यान, ‘भूल भूलैय्या ३’ मध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन, तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षित प्रमुख भूमिरकेत दिसणार आहेत. 'भूल भूलैय्या ३'मध्ये पुन्हा मंजुलिका भीती निर्माण करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.