डोंबिवलीकरांनी अनुभवला रावण वधाचा सोहळा

13 Oct 2024 15:42:35

ravan dahan
 
डोंबिवली दि. १३ : (Dombivali) नवरात्रीचा समारोप विजयादशमीच्या दिवशी होतो. अखेरचा दिवस असल्याने गरबा प्रेमींनी डोंबिवलीच्या सावळाराम क्रीडा संकुलात 'नमो - रमो गरबा' महोत्सवाला मोठी गर्दी केली होती. दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी या गरबा महोत्सवात रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. यंदाही हा क्षण आपल्या मोबाईल मध्ये टिपण्यासाठी हजारो डोंबिवलीकरांनी मोठया संख्येने गर्दी केली होती. डोंबिवलीचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते रावणाचा अग्निबाणाने वध करण्यात आला.
 
प्रभु श्रीरामाची एक आकर्षक प्रतिकृती अणि राक्षसरुपी रावणाचा दशमुखी पुतळा तयार करण्यात आला होता. श्रीरामांच्या हाती असलेल्या धनुष्यातून अग्नीने प्रज्वलित केलेला बाण मंत्री चव्हाण यांनी दूरवर उभ्या केलेल्या रावणाच्या दिशेने सोडला. या रावणाच्या पुतळ्यातील हजारो फटाक्यांनी पेट घेतला. आकाशात देखील फटाक्यांची रोषणाई झाली. अश्या पद्धतीने रावण वधाचा सोहळा पार पडला. हा अविस्मरणीय अनुभव उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात साजरा केला.
 
तत्पूर्वी शनिवारी गरब्याच्या शेवटच्या दिवशी नमो - रमो गरबा हाऊस फुल्ल झाला होता. गुजराती सुपरस्टार अभिनेता मल्हार ठक्कर अणि 'हसल २' मधील महाराष्ट्राची सुप्रसिद्ध रॅपर आर्या जाधव यांची विशेष उपस्थिती होती. मल्हार ठक्कर याने गुजराती भाषेतून उपस्थितांशी सवांद साधताना रविंद्र चव्हाण यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. आर्या जाधव हिच्या सुप्रसिद्ध 'नऊवारी' या रॅप साँग वर पारंपरिक मराठी वेशभूषेतील तरुणींनी मनसोक्त नृत्य केले.
 
 
Powered By Sangraha 9.0