साथीदाराच्या मृत्यूचा बदला आणि दाऊद कनेक्शन

13 Oct 2024 19:52:07

siddiqui connection

मुंबई :
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे बिश्नोई गँग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली. या संदर्भात समाजमाध्यमांवर एक पोस्ट व्हायरल होते आहे, ज्यामध्ये बिश्नोई गँगने या हल्ल्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

हत्येमागचे "दाऊद" कनेक्शन.
व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये बिश्नोई गँगनी म्हटले आहे की, बाबा सिद्दीकी यांचे सलमान खान यांच्याशी जवळचे संबंध असल्यामुळे आम्ही त्यांना संपवले आहे. आमची कुणाशीही दुश्मनी नाही, पण जी व्यक्ती सलमान खान किंवा दाऊद इब्राहिम यांना सोबत करेल, त्यांना आम्ही सोडणार नाही. एके काळी या बाबा सिद्दीकीचे नाव दाऊद इब्राहिम सोबत मकोका कायद्यात जोडले गेले होते. जे लोक दाऊदच्या गँगला सपोर्ट करतील आणि आमच्या अनुज थापन सारख्या निर्दोष भावाला मारतील तोवर हे असेच सुरु राहील. असे मत बिश्नोई गँगने फेसबुक पोस्ट द्वारे व्यक्त केले आहे.

कोण होता अनुज थापन ?
१४ एप्रिल २०२४ रोजी मुंबईच्या वांद्रे इथल्या सलमान खानच्या गॅल्कसी अपार्टमेंट बाहेर दोन माणसांनी गोळीबार केला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना गुजरात मधून अटक केली. अनुज थापन या युवकाला दोघांना हत्यार पुरवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. अटक झाल्याच्या थोड्याच दिवसांनी अनुज थापन याने जेलमध्ये आत्महत्या केली असल्याचा दावा पोलिसांनी केला. अनुज हा मूळचा पंजाबचा असून, त्याच्यावर खंडणी वसूल केल्याप्रकरणी आणि खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ३ गुन्हे दाखल केले होते. बिश्नोई गँगने केलेल्या पोस्टनुसार अनुज थापनला जाणीवपूर्वक जेल मध्ये मारण्यात आले होते. त्याच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठीच त्यांनी बाबा सिद्दीकीला मारले. पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या पोस्टच्या सत्यतेबद्दलचा तपास सुरु आहे.
 

Powered By Sangraha 9.0