मुंबई : (Baba Siddique Murder Case )राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. मात्र तिसरा मारेकरी अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान अटक केलेल्या २ मारेकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर रविवारी दुपारी दोन्ही आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यातील एका आरोपीने वयाबाबत खुलासा केल्याची माहिती समोर आली आहे.
सुनावणीदरम्यान कोर्टाने वयाबाबत विचारणा करताच आरोपी धर्मराज कश्यपने स्वत:चे वय १७ वर्षे सांगितले. त्याच्या मते तो केवळ १७ वर्षांचा असून या प्रकरणामध्ये त्याला अल्पवयीन म्हणून ग्राह्य धरावे. आरोपीच्या वकिलांनी देखील कोर्टासमोर आरोपीचे वय अल्पवयीन असल्याचा युक्तिवाद केला. तर आधारकार्डनुसार आरोपीचे वय १९ असल्याचा पोलिसांचा दावा आहे. आरोपीच्या वयाबाबत सत्यता तपासण्यासाठी कोर्टाकडून आरोपीचे आधार कार्ड मागवण्यात आले.
आधारकार्ड बनावट असल्याचा दावा
आरोपीच्या वकिलांकडे त्याच्या वयासंबधित पुरावे नाहीत असा दावा सरकारी वकिलांनी केला. या गुन्ह्यांमध्ये आरोपी अनेकदा स्वत:च्या बचावासाठी बनावट आधारकार्डही बनवतात असाही दावा सरकारी वकिलांनी केला. आरोपी वयाचा खुलासा करण्यासाठी वैद्यकीय चाचणी करण्यास तयार आहे. तसेच सरकारी वकिलांकडून आरोपीच्या १४ दिवसांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली.