मुंबई : ( Ratan Tata ) प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे दोन दिवसांपूर्वी बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी देहावसान झाले. त्यांच्या निधनामुळे साऱ्या उद्योगविश्वाला धक्का बसला. रतन टाटा हे मोठे उद्योजक जरी असले तरी इतर उद्योजकांपेक्षा ते वेगळे आहेत हे त्यांनी पदोपदी दाखवून दिले. त्यामुळेच जगभरातील अनेक दिग्गजांकडून त्यांच्या कार्यकर्तृत्वास आदरांजली वाहण्यात आली. अशातच एका मोठ्या उद्योजकाने केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. पेटीएम चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करणारी एक पोस्ट केली होती. मात्र या पोस्टमधील काही शब्दांमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केले.
नेमकी काय होती पोस्ट
त्या पोस्टमध्ये " रतन टाटा हे प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारे आदर्श व्यक्तिमत्त्व होते. भारतामधील या सर्वात प्रेमळ उद्योजकांबरोबर पुढील पिढीच्या उद्योजकांना संवाद साधता येणार नाही. ओके टाटा बाय, बाय ", असं विजय शर्मा यांनी लिहिले होते.
त्यांनी लिहिलेल्या शेवटच्या ओळीमुळे त्यांची ही पोस्ट वादग्रस्त ठरली. 'ओके टाटा बाय, बाय' यांमध्ये त्यांनी रतन टाटांच्या आडनावाचा उपहासात्मक वापर करून त्यांना मानवंदना दिली, हे नेटकऱ्यांसहीत अनेकांना खटकले. सगळीकडून जोरदार टीकेचा सामना करावा लागल्याने त्यांनी ही पोस्ट सोशल मीडियावरुन डिलीट केली आहे. कोणाकडून तरी लिहून घेतले असेल किंवा चर्चेत राहण्याची संधी कधीच सोडत नाही, अश्या प्रकारच्या टीका शर्मा यांच्यावर करण्यात आल्या आहेत.