मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sajag Raho Abhiyan) महाराष्ट्रात एकीकडे समाजाला जाती-जातींमध्ये विभागून त्यांच्यात वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. तर दुसरीकडे धार्मिक स्थळे आणि उत्सवांवर हल्ले होत आहेत. समाजाला भयंकर अराजकात ढकलण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. त्यासोबतच लोकशाही मूल्यांचा आणि संविधानाचाही घोर अपमान केला जात आहे. महाराष्ट्राला या अराजकतेतून बाहेर काढण्यासाठी सामान्य नागरिकांसह राज्यातील ६५ हून अधिक सामाजिक संस्था आणि विचारवंतांनी एकत्र येऊन ‘सजग रहो’ अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रभर ‘शिवप्रेरणा यात्रा’ सुरु झाली आहे. अशी माहिती पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी गुरुवारी सत्यनारायण प्रसाद कॉम्प्लेक्स, विलेपार्ले पूर्व येथे झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान दिली.
हे वाचलंत का? : संस्कार भारती पश्चिम प्रांत पिंपरी चिंचवड समिती तर्फे आयोजित ‘सृजन’
'सजग रहो' अभियानाचे महाराष्ट्र संयोजक रवींद्र गोळे आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, विदर्भातील मातंग साहित्याचे अभ्यासक पद्मश्री नामदेवराव कांबळे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, अविनाश धर्माधिकारी, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, धनंजय भिसे, आंबेडकरी विचारवंत ॲड. क्षितिज टेक्सास गायकवाड ही आदरणीय मंडळी मंचाचे नेतृत्व करणार आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून असलेली आपली ओळख धुसर होत असून जाती, पंथ, संप्रदाय यामध्ये समाज विभागत आहे. म्हणून एक महाराष्ट्र-श्रेष्ठ महाराष्ट्र ही भूमिका घेऊन सजग रहो अभियान सुरु केले आहे.
पत्रकार परिषदेत गिरीश प्रभुणे उपस्थितांना संबोधत म्हणाले की, ‘श्रेष्ठ महाराष्ट्र–विकसित महाराष्ट्रा’चा संकल्प प्रत्यक्षात आणण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात जनजागृतीसाठी ‘सजग रहो’ हे अभियान राबविण्याचा निर्णय राज्यातील विविध सामाजिक संस्थांकडून घेण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांत अनुसूचित जाती-जमाती, वनवासी बांधव आणि मागास समाजासाठी सर्वाधिक योजना आणून त्या राबविल्याही गेल्या. परंतु समाजातील काही राजकीय पक्षांच्या व्यक्ती आणि दांभिक सामाजिक संस्था समाजाला संभ्रमित करण्याच्या पूर्ण प्रयत्नात आहेत. त्यामुळे अशा महाराष्ट्रविरोधी आणि हिंदूंमध्ये फूट पाडणाऱ्या शक्तींना रोखण्यासाठी समाजाशी संवाद साधण्याची आवश्यकता असल्याचे गिरीश प्रभुणे यांनी सांगितले. त्याकरीता देशाला एकसंघ ठेवणाऱ्या पक्षालाच मतदान करणे का महत्त्वाचे आहे, यावर विशेष भर देण्यात आला.