उद्योगविश्वातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व : रतन टाटा

    10-Oct-2024
Total Views |
business tycoon ratan tata passed away


इंग्रजीतलं आद्यक्षर टी म्हणजे टाटा नव्हे तर 'ट्रस्ट'. उद्योग विश्वात विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे टाटा उद्योगसमूह. टाटा समूहाने आजवर ग्राहकांचे हित जपत आपल्या उद्योगविस्तारासह जगभरातील असंख्य लोकांच्या मनावर राज्य केले आहे. देशाच्या आर्थिक विकासात भरीव योगदान देणाऱ्या उद्योजकांच्या यादीत रतन टाटांचे नाव अग्रणी राहील. रतन टाटा यांच्या निधनाने अवघे उद्योगविश्व हळहळले आहे. तब्बल ३० लाख कोटींचा उद्योगसमूह असलेल्या रतन टाटांच्या मृत्यूपश्चात केवळ ३,८०० कोटींची संपत्ती मागे सोडून गेले आहेत. खरंतर, उद्योग उभारताना कुठल्या एका व्यक्तीचा आदर्श घ्यावा असं व्यक्तिमत्तव म्हणजे रतन टाटा. अगदी शाळेतल्या विद्यार्थ्यांपासून ते वयोवृध्द व्यक्तींपर्यंत 'टाटा' हे वलय माहीत नसणं हे दुर्मिळचं!

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. वडील नवल आणि आई सुनू टाटा यांचे सुपुत्र असलेले रतन टाटा हे वयाच्या अवघ्या दहा वर्षी पालकापासून विभक्त झाले. पालकांच्या विभक्ततेचा मुलावर नक्कीच परिणाम होतो, परंतु त्याच्या आजीने त्यांना सांभाळ करत संस्कार केले. मुंबईच्या कॅम्पियन स्कूलमधून ८वीपर्यंत शालेय शिक्षण घेणाऱ्या रतन टाटांनी पुढील उर्वरित शिक्षण कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, मुंबई आणि बिशप कॉटन स्कूल, शिमला येथून पूर्ण केले. उच्च शिक्षणाकरिता वयाच्या १७व्या वर्षी अमेरिकेला गेले, तिथे त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये बॅचलरची पदवी मिळवली. ते इथवरंच थांबले नाहीत १९७५ साली नामांकित हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून प्रगत व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर १९८१ मध्ये रतन टाटा 'टाटा इंडस्ट्रीज'चे चेअरमन झाले. त्यानंतर आजतागायत रतन टाटांनी यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली. रतन टाटांना फिरण्याची आवड नव्हती आणि ना त्यांना भाषण द्यायला आवडायचे. बडेजाव आणि दिखाऊपणा त्यांच्या आसपासदेखील नसायचा. असं म्हटलं जायचं की, लहानपणी जेव्हा त्यांना शाळेत रोल्स रॉईसमधून सोडलं जायचं तेव्हा ते अवघडून जायचे.

रतन टाटा ज्यावेळेस टाटा सन्सचे चेअरमन झाले तेव्हा त्यांनी जेआरडी टाटा यांच्या रुममध्ये बसले नाहीत. त्यांनी स्वतः छोटाश्या रुममध्ये बसणे पसंत केले. तेच त्यांचे कार्यालयदेखील बनले. आधुनिकतेची कास धरणाऱ्या टाटांनी संपूर्ण उद्योगक्षेत्र दणाणून सोडले. म्हणजे बघाना, अगदी रोजच्या जेवणातल्या मीठापासून ते विमानापर्यंत सर्वच क्षेत्रात आपला दबादबा निर्माण करणाऱ्या टाटा समूहाची वाटचाल टाटांच्या नेतृत्वात उत्तरोत्तर थक्क करणारी. समाजकार्यापासून ते देशकार्यात रतन टाटा कधीच मागे राहिले नाहीत. अगदी साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी हेच जीवनतत्व अनुसरणाऱ्या टाटांनी नेहमीच गरीबांच्या आर्थिक सुबत्तेस प्राधान्य दिले. गरिबीशी झुंजणाऱ्या भारतासारख्या देशात सर्वसामान्यांना कार विकत घेणेदेखील स्वप्नवत वाटायचे त्यांच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी टाटांचीच 'नॅनो' रस्त्यावर धावली. त्याचबरोबर, देशातल्या आयटी क्षेत्रात भरीव योगदान देणारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(टीसीएस) कंपनी जगभरातील २० हून अधिक देशात कार्यरत आहे. किंबहुना, देशात भरतीप्रक्रिया राबविण्यासाठी टीसीएसची मोठी मदत होते. टायटन, टाटा मोटर्स, टाटा टी, टाटा एल्क्सझी, यांसारख्या वीसहून अधिक कंपन्या असल्यातरी रतन टाटा यांनी अनेक वर्षे टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून कामकाज पाहिलं आहे.

आपल्या उद्योग भरभराटीत योगदान असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकांशी आपुलकीचे नातं जोडणाऱ्या स्वतःच्या मालकीच्या ताजहॉटेल वरील २६/११ दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या प्रत्येकाच्या मदतीसाठी धावून जाताना प्रत्येकाने पाहिले. एका मुलाखतीत रतन टाटा म्हणाले होते की, त्या रात्री हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना फोन केला. मात्र कोणीही फोन उचलला नाही. मला थोडं आश्चर्य वाटलं. कारण यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं. त्यानंतर मी माझी कार घेऊन हॉटेलवर पोहोचलो. परंतु, वॉचमनने मला बाहेरच रोखलं. त्याने सांगितलं हॉटेलमध्ये गोळीबार सुरू आहे. त्या भ्याड हल्ल्याचे तीन दिवस आणि तीन्ही रात्री मी हॉटेल व्यावस्थापकांबरोबर थांबलो, सगळी व्यवस्था पाहिली, असे रतन टाटा म्हणाले. त्यावेळेस व्यासायिकता बाजूस ठेवून केवळ उदात्त भावनेने हॉटेलच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ३६,८५ लाख रुपये सुपूर्द केले. तसेच, कर्मचारी निवृत्त होण्याच्या कालावधीपर्यंत कुटुंबीयांना वेतनासह मुलांच्या शिक्षणाची व्यवस्थादेखील टाटांनी केली. रतन टाटा यांच्या औदार्याचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले.

उतारवयात रतन टाटा अविवाहित असले तरी त्यांना कधीच एकटेपणाची जाणीव झाली आहे. अखेरपर्यंत त्यांच्याकडे दोन जर्मन शेफर्ड श्वान होते. एकाचं नाव 'टीटो' तर दुसऱ्याचं 'टँगो'. हे दोन्ही श्वान त्यांचे फार लाडके होते. ते जेव्हा बॉम्बे हाऊसमध्ये पोहोचायचे तेव्हा रस्त्यावरील श्वानदेखील त्यांच्याभोवती गोळा होत. गमतीची गोष्ट म्हणजे माणसांसोबतच प्राण्यांनादेखील आपलेसे करणाऱ्या टाटांचा याच श्वानप्रेमाचा एक रंजक किस्सा आहे. या प्रेमाचा अनुभव चक्क ब्रिटिश राजघराण्याला प्रत्ययास आला होता. तर झाले असे की, एकदा रतन टाटा यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यासाठी राजघराण्याने बकिंगहम पॅलेसमध्ये पुरस्कार सोहळा आयोजित केला होता.

ठरल्याप्रमाणे रतन टाटांनी पुरस्कार सोहळ्यासाठी जाण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार त्यांनी नियोजनदेखील केले परंतु, सोहळ्याच्या अगदी दोन तीन दिवस आधीच टाटांनी आपण उपस्थित राहू शकत नसल्याचे राजघराण्याला कळविले. भारतीय उद्योगपती, स्तंभलेखक सुहेल सेठ यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये असे म्हटले होते की, 'मी लंडन एअरपोर्टवर उतरेपर्यंत मोबाईलवर रतन टाटा यांचे तब्बल ११ मिस्ड कॉल्स होते. त्यानंतर मी जेव्हा त्यांना कॉल केला, तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. त्यांचे दोन कुत्रे टँगो आणि टिटो यांच्यापैकी एक प्रचंड आजारी पडला होता. असे सांगत टाटांनी आपण पुरस्कार सोहळ्याला येऊ शकत नाही, असे कळविले होते'.

यातून रतन टाटा यांना प्राण्यांबद्दल किती लळा होता याचा प्रत्यय येतो. दरम्यान, सुहेल सेठ यांनी रतन टाटांना समजावण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु, त्यावेळेस रतन टाटांना केवळ त्यांच्या आवडत्या 'टँगो' आणि 'टिटो'सोबत थांबणं प्राधान्याचं होतं. रतन टाटा यांच्या या कृतीबाबत जेव्हा प्रिन्स चार्ल्सला यांना कळले तेव्हा त्यांना याचे मोठे कौतुक वाटले. ते म्हणाले, हा खरा माणूस आहे. टाटांनी आपले निस्सीम प्राणीप्रेम जपताना मुंबईत टाटा ट्रस्टचं ‘स्मॉल अॅनिमल हॉस्पिटल’ देखील सुरू केले. एकूणातच काय, अशा दानशूर व्यक्तीबद्दल कितीही बोललं गेलं तरी ते कमीच पडेल. कारण यांना कधीच प्रसिध्दी मिळविण्याचा अट्टाहास नसतो. त्यामुळेच आज रतन टाटांचे जाणे प्रत्येकाच्या मनाला सुन्नं करणं आहे.

सर्वसामान्यांपासून ते उद्योजक, राजकारणी, क्रीडापटू ज्यांना ज्यांना त्यांचा सहवास लाभला अशा प्रत्येकाने त्यांच्याप्रती शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सरकारने देखील एक दिवसाचा दुखवटा जाहीर करत त्यांच्या कार्यकतृत्वाचा आदर केला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शेवटी काय हो, टाटा ग्रुपशी आपला सर्वांचा दैनंदिन व्यवहारात संबंध येत राहणार आहे. त्यामुळे त्यांच्या उद्यमशीलतेचा वेळोवेळी अनुभव येतच राहणार आहे. उद्योजकांना हवहवंसं वाटणारं उद्यमी व्यक्तित्व नव्या पिढीतील उद्योजकांना प्रेरित करत राहिलं, यात तीळमात्र शंका नाही. कारण लिजेंड नेव्हर डाय.....; सर्वसामान्यांमध्ये उद्योजकतेची जाणीव जागृती करणाऱ्या 'उद्योग'रत्न रतन टाटा यांना महाएमटीबीकडून भावपूर्ण श्रध्दांजली!