सुतार समाज महामंडळाला 'संत भोजलिंग काका' यांचे नाव

    01-Oct-2024
Total Views |

bhojling kaka
 
मुंबई : राज्यातील सुतार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळाला 'संत भोजलिंग काका' यांचे नाव देण्यात आले आहे. मंगळवार, दिनांक १ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला.

ओबीसींमधील एक महत्त्वाचा घटक असलेल्या सुतार समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. सुतार समाज व त्यांच्या विविध पोटजाती हा प्रामुख्याने आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्ह्यात असलेल्या सुतार समाजातील युवकांना बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना अशा विविध योजनांचा लाभ मिळून सुतार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्याकरिता सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय दिनांक १६ मार्च २०२४ रोजी घेण्यात आला. त्यासाठी सुमारे ५० कोटी रुपये भागभांडवलाची तरतूद करण्यात आली होती.

या महामंडळाला 'संत भोजलिंग काका' यांचे नाव देण्याची मागणी समाजातील नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार, हे नामकरण करण्यात आले आहे. राज्यातील सुतार समाजांतर्गत येणाऱ्या सर्व पोटजातींच्या सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी यासाठी स्थापना करण्यात येत असलेल्या या महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे तर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा कार्यालये कार्यरत राहतील. सुतार समाजातील युवकांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांना व्यवसाय उद्योग उभारण्यासाठी या महामंडळाच्या माध्यमातून भरीव मदत करण्यात येणार आहे.