मुंबई : "उद्धव ठाकरेंनी एकदा आरसा बघावा. ज्या काश्मीरमध्ये ज्या ‘कलम ३७०’ मुळे काश्मीर भारतापासून वेगळे झाले होते. ते ‘कलम ३७०’ रद्द करणारे मोदी यांच्यासोबत गृहमंत्री अमित शाह आहेत. आज देशात सांस्कृतिक पुनरुत्थान पाहायला मिळत आहे. राम मंदिर असेल किंवा काशी विश्वनाथ मंदिर असेल. हिंदू म्हणून आमची ओळख पुसण्याचा जो प्रयत्न झाला, ५०० वर्षांनंतर तो प्रयत्न मोडून काढणारे आमचे नेते आहेत. त्यांचे असे संबोधन करणार्यांनी एकदा आपला चेहरा आरशात पाहून घ्या"असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंनी नागपूर येथे संबोधन करताना देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकेचा सूर आवळला. या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर देत, "उद्धव ठाकरे स्वतःला आरशात बघा" असा सल्ला दिला. यासोबतच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिममंडळ बैठकीत निर्णयासोबतच मराठा आरक्षण यांसारख्या विविध विषयांवर कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यंमत्री फडणवीस म्हणाले की, “आज मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्राला विकसित करण्याकरिता महाराष्ट्रातील विविध समाजांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरिता अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतले आहेत. हे निर्णय घेणारे सरकार आहे, हे यातून सगळ्यांच्या लक्षात आले असेल. विरोधकांनी योजनांबाबत संभ्रम पसरविण्यास सुरुवात केली आहे. आम्ही सुरू केलेल्या सर्व योजना या अर्थसंकल्पात आहेत. पगाराकरिता किंवा इतर कोणत्याही योजनांकरिताही अडचण नाही. विकासाकरिता अडचण नाही. हे सर्व पैसे आम्ही अर्थसंकल्पात टाकलेले आहेत. विरोधकांच्या आता पोटात दुखायला लागल्याने ते रोज नवीन संभ्रम निर्माण करत आहेत. कोणतीही योजना बंद होणार नाही,” असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
फडणवीस पुढे म्हणाले, “मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी आमचे सरकार सातत्याने कार्यरत आहे. आज ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळा’च्या माध्यमातून एक लाखांहून अधिक उद्योजक आम्ही तयार करून दाखविले आहेत. ‘सारथी’च्या माध्यमातून आयएएस, आयपीएस अधिकारी घडविले आहेत. वसतिगृह न मिळालेल्यांच्या अडचणी सोडविल्या आहेत. दहा टक्के आरक्षण दिले आहे. ज्यांचा कुणबी दाखला मिळतो, त्यांना आरक्षणाचे लाभ मिळतात. शिंदे समितीचा अहवाल आम्ही मान्य केला असून ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्या मराठा समाजातील तरुणांचा फायदा होणार आहे. कोणी कितीही टीका केली, तरी या टीकेला आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ,” असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.