मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गौमातेला 'राज्यमाता-गोमाता' (VHP on Rajyamata Gomata) म्हणून घोषित करत महाराष्ट्र राज्य सरकारने सोमवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐतिहासिक आणि स्तुत्य असल्याचे म्हणत विश्व हिंदू परिषद कोकण प्रांतने सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभारही मानले आहेत. हे पाऊल आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांच्या रक्षणाप्रती सरकारची बांधिलकीच दर्शवत नाही तर आपल्या देशातील करोडो गोभक्त आणि धार्मिक लोकांच्या भावनांचा आदर करते. असे विहिंपने मंगळवार, दि. ०१ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
हे वाचलंत का? : देशी गायींच्या पालन-पोषणासाठी सरकारची 'अनुदान योजना'
गोमाता भारतीय समाजात पवित्रता, करुणा आणि पोषण यांचे प्रतीक आहे. सरकारचा हा निर्णय केवळ गोमातेचे संरक्षण आणि सन्मान नवीन उंचीवर नेणारा नाही तर आपल्या भावी पिढ्यांसाठी एक आदर्श उदाहरण देखील असल्याचे विपिंहने म्हटले आहे. सरकारने उचललेल्या या पावलाचा समाजावर सकारात्मक परिणाम होईल आणि धर्म, संस्कृती आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी भक्कम पाया मिळेल यात शंका नाही. आता महाराष्ट्रात गोहत्या पूर्णपणे बंद होणार हा विश्वास आणखी दृढ झाला आहे. गोमातेला 'राज्यमाता' हा दर्जा दिल्यानंतर सरकार गोवंश सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देईल, अशी अपेक्षा पत्रकाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.
पुढे त्यात म्हटलंय की, जे बजरंग दलाचे निःस्वार्थी कार्यकर्ते कायद्याचे पालन करत गोमातेचे रक्षण करतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. या योद्ध्यांनी नेहमीच आपली संस्कृती आणि परंपरांचे रक्षण केले आहे आणि आता त्यांना आदर आणि पाठिंबा मिळण्याची वेळ आली आहे. आम्हाला आशा आहे की आपल्या नेतृत्वाखाली सरकारच्या वतीने धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भविष्यातही अशीच ठोस पावले उचलली जातील.