मुंबई : आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणारा 'दि एआय धर्मा स्टोरी' २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच ही तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून चित्रपटाचे नवीन पोस्टरही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यात पुष्कर जोगबरोबर स्मिता गोंदकर आणि दीप्ती लेले दिसत आहेत. पोस्टर पाहून चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेल्या या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर सुरेखा जोग यांनी केले असून बियु प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. पुष्कर जोगने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच वेगळे, नवीनपूर्ण चित्रपट दिले आहेत. त्यामुळे या चित्रपटाही प्रेक्षकांना काहीतरी नवीन अनुभवायला मिळेल, हे नक्की !
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात , "२५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा एक वेगळा विषय असून एका वडिलांची आणि मुलीची ही गोष्ट आहे. एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून वैयक्तिक सूड उगवण्याचा प्रयत्न करत एका निष्ठावंत बापाच्या मुलीचे अपहरण केले जाते. आपल्या मुलीला पुन्हा जिवंत पाहाण्यासाठी धर्म मुक्तीच्या धोकादायक प्रवासाला निघालेल्या या वडिलांची ही गोष्ट आहे. हॅालिवूडमध्ये ज्याप्रमाणे ॲक्शन सिक्वेन्स असतात, तसे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. एक नवा प्रयत्न यातून करण्यात येत आहे.’’