मुंबई : "मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सुरू केलेले 'हर घर दुर्गा अभियान' नारी शक्तीला सशक्त, सामर्थ्यशाली आणि स्वावलंबी बनवेल, भारताला नवी दिशा देईल. त्यामुळे यापुढे हे अभियान केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण देशाचे अभियान होईल", असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवार, दि. ३० सप्टेंबर रोजी केले.
राज्यातील महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत 'हर घर दुर्गा' अभियान हाती घेण्यात आले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते सोमवारी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. कुर्ला येथील महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, प्रसिद्ध अभिनेत्री अदा शर्मा, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, विकास आयुक्त प्रदिपकुमार डांगे, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.
या अभियानाच्या माध्यमातून शासकीय औद्योगिक संस्थांमधील (आयटीआय) तरुणींना स्वरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये संपूर्ण वर्षभर आठवड्यातून २ ते ३ वेळा तासिका स्वरूपात आयोजित केले जाणार आहे. ज्याप्रमाणे इतर विषयांचे अभ्यासक्रम आणि तासिका असतात त्याप्रमाणे आत्म संरक्षणाच्या सुद्धा तासिका असाव्यात, अशी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांची संकल्पना होती. त्यानुसार 'हर घर दुर्गा अभियान उदयास आले आहे.
उपस्थितांना संबोधित करताना ओम बिर्ला म्हणाले, "मंगल प्रभात लोढा हे सातत्याने नवनवीन प्रयोग करीत असतात. महाराष्ट्रातील युवा पिढी कुशल घडावी, यासाठी ते करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करावे, तितके कमी आहे. हर घर दुर्गा अभियान केवळ महाराष्ट्र नव्हे, तर देशभरातील नारी शक्तीला सशक्त करण्यासाठी उपयुक्त ठरेल. देशाला नवी दिशा देईल. या उपक्रमासाठी देशातील प्रत्येक आयटीआय, शिक्षण संस्थांमध्ये लोढा यांचे नाव आदराने घेतले जाईल", असे कौतुकोउद्गार बिर्ला यांनी काढले.
सशक्त नारी घडवणार : मंगल प्रभात लोढा
स्वरक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. हर घर दुर्गा अभियानाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक महिलेला स्वतःचे रक्षण करण्यासाठी सुसज्ज करत आहोत. हा उपक्रम फक्त आत्मरक्षणाचे कौशल्य शिकवणार नाही, तर आपल्या महिलांमध्ये आत्मविश्वास आणि धैर्य निर्माण करेल. स्त्री सक्षमीकरण हा फक्त प्राधान्याचा नाही, तर आपल्या सर्वांच्या जबाबदारीचा मुद्दा आहे. हर घर दुर्गा अभियानाच्या माध्यमातून अधिक सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण पिढी घडवण्यासाठी आपण पायाभरणी करत आहोत. ४७२ आयटीआयमध्ये एक वर्ष अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. नवरात्रोत्सव मंडळांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. देशाची सर्वोच्च संस्था असलेल्या लोकसभेच्या अध्यक्षांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणे, ही बाब आम्हाला नवीन ऊर्जा देणारी आहे, असे प्रतिपादन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
दिवसाची सुरुवात शिव तांडव आणि कालिका स्तोत्राने होते : अदा शर्मा
माझी दिवसाची सुरुवात शिव तांडव आणि कालिका स्तोत्र म्हणून होते. आपण जेव्हा स्वसंरक्षणाचे धडे घेतो, तेव्हा एकाग्रता महत्त्वाची असते. त्यासाठी हे स्तोत्र औषध म्हणून काम करेल. आज या अभियानाचे नाव 'हर घर दुर्गा' असल्याचे ऐकून अत्यानंद झाला, असे मत अभिनेत्री अदा शर्मा यांनी व्यक्त केले.
कुर्ला 'आयटीआय'ला महाराणा प्रतापांचे नाव
राज्यातील 'आयटीआय'चे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे नुकताच घेण्यात आला. त्या अनुषंगाने या कार्यक्रमात कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक संस्था असे करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात डिजिटल एक्सलन्स सेंटर देखील येथे उभारण्यात येणार आहे, असे देखील मंत्री लोढा यांनी सांगितले.