राममंदिरात वास्तुकलेचे अद्भुत प्रदर्शन! प्रभू श्रीरामांच्या मस्तकावर सूर्याची किरणे पडणार

09 Jan 2024 12:24:17
surya kiran ram mandir
 
लखनौ : अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या मूर्तीच्या कपाळावर सूर्याची किरणे पडणार असल्याची माहीती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिली आहे. दरवर्षी एका विशिष्ठ दिवशी सुर्य़ाची किरणे प्रभू श्री रामचंद्रांच्या मुर्तीवर पडतील अशा प्रकारे राममंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे.
 
रामलल्लांची मूर्ती ही पाच वर्षे वय असलेल्या रामांच्या बालपणीचे स्वरूप दर्शवणारी असणार आहे. मूर्ती पायाच्या बोटापासून कपाळापर्यंत ५१ इंच इतकी उंच आहे. या मूर्तीचे वजन १५०० किलो म्हणजेच दीड टन असणार आहे. प्रभू श्रीरामचंद्रांना दररोज शरयू नदीच्या पाण्याने अभिषेक केला जातो. दर्शनानंतर भाविकांना हे पाणी प्रसाद म्हणुन दिले जाणार आहे. अचल मुर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरही ही परंपरा कायम राहणार आहे.
 
रामलल्लांच्या अचल मुर्तीवर दुध आणि पाण्याचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही असे ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले. प्राणप्रतिष्ठेसाठी तीन मुर्ती बनवण्यात आल्या होत्या. त्यातील निळ्या रंगाच्या अरुण योगिराज यांनी बनवलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेसाठी निवड करण्यात आली आहे. दरवर्षी चैत्र महिन्यात राम नवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता सूर्याची किरणे प्रभू श्रीरामाच्या कपाळावर पडतील असे सांगण्यात आले आहे. येत्या २२ जानेवारीला राममंदिरात प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0