मुंबई : मंगळवारी सकाळी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकरांवर मुंबई महापालिकेच्या जागेवर ५०० कोटींच्या फाईव्ह स्टार हॉटेलचे बांधकाम केल्याचा आरोप केला होता. आता त्यांच्या घरी ईडीची धाड पडली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, किरीट सोमय्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
किरीट सोमय्या म्हणाले की, "उद्धव ठाकरे असो किंवा त्यांचे पार्टनर रवींद्र वायकर, संजय राऊत, अनिल परब या सर्वांनी कोविडमध्ये फक्त कमाई करण्याचं पाप केलं. जुलै २०२१ मध्ये उद्धव ठाकरेंनी रवींद्र वायकर यांना गैर कायदेशीर रितीने जोगेश्वरी येथे अनधिकृत ५ स्टार हॉटेल बांधण्याची परवानगी दिली. हा घोटाळा उघडकीस आल्यावर उद्धव ठाकरेंनी हे प्रकरण दाबलं. परंतू, हे सगळं आता बाहेर आलेलं आहे. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंचे पार्टनर आहेत. अलिबाग येथील १९ बंगल्याचा घोटाळादेखील वायकर आणि ठाकरेंनी एकत्र केला आहे. रवींद्र वायकर यांनी नोट बंदीमध्येही हात धुवून घेतला होता. त्यामुळे हिसाब तो देना पडेगा," असेही ते म्हणाले आहेत.
जुलै २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोगेश्वरी येथे लहान मुलांच्या खेळाच्या मैदानावर २ लाख स्केवअर फुटाचे ५०० कोटी रुपयांचे ५ स्टार हॉटेल बांधण्याची परवानगी रवींद्र वायकर यांना दिली होती. दरम्यान मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बॅक्वेटच्या नावाने हा शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप वायकर यांच्यावर किरीट सोमय्या यांनी केला आहे.