माता न तूं, वैरिणी

09 Jan 2024 21:24:54
Suchana Seth


भारतीय संस्कृतीत मातेला फार मोठे महत्त्व आहे. मातेची प्रतिमा कोमल हृदय, मृदू, दयाळू दाखविण्यात आली आहे, तर दुसरीकडे मातेच्या क्रूर कृत्याचाही उल्लेख वेळोवेळी आढळतो. त्यातूनच ‘माता न तूं, वैरिणी’ असेही म्हटले जाते. मातेची ही विविध रुपे आजच्या युगात दिसून येतात. बुद्धिजीवी व्यवसायात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे, नावलौकिक प्राप्त केलेली सूचना सेठ या महिलेने गोव्यात आपल्याच मुलाची हत्या केली. सूचना सेठ हे नाव कार्पोरेट जगतात सुपरिचत आहे. ’एआय एथिक्स’च्या यादीत १०० प्रतिभावान महिलांमध्ये त्यांचा समावेश आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डाटा सायंटिस्ट यात त्यांना दीर्घ अनुभव आहे. परंतु, कौटुंबिक कलहातून त्यांनी आपल्याच मुलाची हत्या केल्याचे म्हटले जात आहे.यशस्वी बुद्धिजीवी महिला कू्र्रर माता का बनली, हा चिंतनाचा विषय ठरू शकतो. सूचना सेठ हिने गोव्यात आपल्याच मुलाची हत्या करून, त्याचा मृतदेह बॅगमधून बंगळुरूला नेला. त्या ज्या हॉटेलमध्ये थांबली होती. तेथील कर्मचार्‍याला तिच्या रूममध्ये रक्ताचे डाग आढळले आणि या क्रूर मातेचा खरा चेहरा उघड झाला. बंगळुरूच्या एका स्टार्टअप कंपनीच्या सीईओने केलेले, हे कृत्य धक्कादायक आहे.सूचना सेठ या ’माईंडफूल एआय लॅब’ या स्टार्टअप कंपनीच्या संस्थापक आहेत. त्या हॉटेलमध्ये येताना, चार वर्षांच्या मुलासोबत आली; मात्र जाताना एकटीच बाहेर पडली. तसेच तिने बंगळुरू येथे जाण्यासाठी विमानाऐवजी टॅक्सीचा हट्ट केल्याने, तिने काहीतरी उलटसुलट कृत्य केल्याचा संशय हॉटेल व्यवस्थापनाला बळावला. त्यातच तिच्या खोलीत रक्ताचे डाग सापडल्याने, तिचे कृत्य उघडकीस आले. पोलिसांनी तिला यासंदर्भात विचारणा केली असता, सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी हिसका बसताच, ती वठणीवर आली. सूचनाचे १४ वर्षांपूर्वी लग्न झाले होते, त्यानंतर घटस्फोटही झाला होता. मुलगा पतीला भेटणे, तिला मान्य नव्हते. त्यामुळे तिने मुलाच्या हत्येचा कट रचला होता. मात्र, तिने रचलेला कट आणि बनाव अखेर उघडकीस आला. एक बुद्धिजीवी यशस्वी उद्योजिका माता म्हणून किती क्रूर ठरली, याचे हे जीवंत उदाहरण आहे.


नेमेचि येते अवकाळी...


वातावरणातील बदलांमुळे ऋतुमानांचे वेळापत्रक पूर्णपणे बदलले आहे. पावसाळ्यात उन्हाळा, उन्हाळ्यात थंडी आणि थंडीत पाऊस म्हणजेच अवकाळी असे नवे वेळापत्रक गेल्या काही वर्षांत दिसून येत आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरपासून सुरू होणारी, थंडी जानेवारीत सर्वाधिक असते. मुंबईसह मोठ्या महानगरांतही हुडहुडीचा लोक आनंद घेतात. मात्र, गेल्या आठवड्यापासून थंडीचे प्रमाण वाढत असतानाच, राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस होत आहे. ही अवकाळी महाराष्ट्रातच झाली, असे नाही तर देशातील आठ राज्यांत ऐन थंडीत अवकाळीने दणका दिला. राज्यात कोकण, विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जनेसह काही भागांत अवकाळीच्या सरी कोसळल्या. त्यामुळे पीकपाण्याचे नुकसान झाले. वातावरणातील हा बदल गारवा वाढविण्याबरोबरच प्रदूषण कमी करण्यासही लाभदायी ठरला. मात्र, त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.देशासह महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळेच ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या आठवड्यात अवकाळीची ही अवस्था कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अवकाळीचा जोर ओसरताच, पुन्हा थंडीचा जोर वाढणार असल्याचे म्हटले जाते. लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वारे असल्यामुळे, गुजरातच्या किनार्‍यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. तो दक्षिण गुजरातपासून ते उत्तर प्रदेशपर्यंत विस्तारलेला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून, अवकाळी होत आहे.मानवाने निसर्गाच्या व्यवस्थेत नको तेवढा हस्तक्षेप करणे, विकासकामांसाठी पर्यावरणाची होत असलेली हानी, त्याचबरोबर पर्यावरणाबाबत मानवात असलेली असंवदेशनशीलता याचा परिणाम ऋतुमानावर झाला आहे. त्यामुळेच ऋतूंचे चक्र आणि वेळापत्रकही बदलले आहे. हा दोष निसर्गाचा नसून, त्याच्या व्यवस्थेत अती हस्तक्षेप केल्याचा तो परिणाम आहे. याबाबत सर्वच स्तरावर जनजागृती होत असली, तरी मानवाची असलेली उदासीनता जोवर कमी होत नाही, तोपर्यंत ‘नेमेची येते अवकाळी’ असेच म्हणावे लागणार आहे.


-मदन बडगुजर


Powered By Sangraha 9.0