२० हजार भारतीय कर्मचारी, २ लाख पर्यटक आणि मालदीव म्हणतयं... 'India Out'

08 Jan 2024 16:48:41
 moujju
 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीव सरकारच्या मंत्र्यांनी आणि तेथील चीनसमर्थक लोकांनी भारतीयांविरोध आणि पंतप्रधानांविरोध गरळ ओकण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकरणानंतर मालदीवमधील भारतविरोध संपूर्ण जगासमोर आला आहे. पण भारतासोबत ऐतिहासिक. सांस्कृतीक आणि आर्थिक संबंध असलेल्या मालदीवमध्ये हा भारतविरोध कसा फोफावला याची माहिती घेणे गरजेचे आहे.
 
मालदीवमध्ये सध्या चीन समर्थक मानल्या जाणाऱ्या मोहम्मद मुइज्जू राष्ट्राध्यक्ष आहेत. आपल्या चीन समर्थक प्रतिमेसोबतच त्यांना भारताचा कट्टरविरोध सुद्धा मानले जाते. मालदीवमधील 'इंडिया आऊट' या मोहिमेचे नेतृत्व त्यांनी केले होते. याचं मुद्द्यावर राजकारण करुन त्यांनी मालदीवची सत्ता मिळवली. पण या इंडिया आउट मोहिमेची सुरुवात मोइज्जू यांनी केली नव्हती. त्यांच्या आधी या मोहिमेची सुरुवात मालदीवचे माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी केली होती.
 
भारत आणि मालदीव दोन्ही देशांमध्ये एकेकाळी ब्रिटिशांची सत्ता होती. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारत आणि मालदीवमध्ये द्विपक्षीय संबंधांची सुरुवात झाली. गेल्या सहा दशकांपासून दोन्ही देशांमध्ये राजनैतिक, संरक्षण, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. भारताच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने मालदीवचे महत्त्व आहे. अरबी समुद्रात द्वीपीय देश असलेल्या मालदीवचे त्याच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे सामरिक महत्त्व आहे. त्यामुळेच भारताच्या परराष्ट्र धोरणात मालदीवला कायम विशेष स्थान देण्यात आले.
 
yamin
भारतीय लष्कराने मालदीवमध्ये ऑपरेशन कॅक्टसद्वारे राष्ट्रपती मौमून अब्दुल गयूम यांचा जीव वाचवला होता. १९८० मध्ये मालदीवचे राष्ट्रपती मौमून अब्दुल गयूम यांच्या तख्तापालट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. भारतीय लष्कराने सैन्य कारवाई करत, तख्तापालटचा प्रयत्न हाणून पाडला होता. या घटनेनंतर भारत आणि मालदीवचे संबंध नव्या उंचीवर जाऊन पोहोचले. पण, २०१३ मध्ये सत्तेत आलेल्या अब्दुल्ला यामीन यांच्या चीन धार्जिण्या धोरणांमुळे या मैत्रीत मीठाचा खडा पडला.
 
यामीनने चीनच्या मदतीने मालदीवमध्ये आपल्या विरोधकांना दडपण्यास सुरुवात केली. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी भारताला विरोध करून राष्ट्रवादाच्या भावना भडकावण्यास सुरुवात केली. यामीनने याचं काळात चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमध्ये सामील होऊन, मालदीवमध्ये चीनच्या मदतीने पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प सुरु केले. पण, या प्रकल्पांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला, असा आरोप यामीनच्या विरोधकांनी केला. आपल्या भ्रष्टाचारावरुन जनतेचे लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी यामीनने भारताला लक्ष करण्यास सुरुवात केली. पण २०१८ मध्ये यामीनचा पराभव झाला.
 
यामीनच्या पराभवानंतर २०१८ मध्ये, इब्राहिम सोलिह यांची मालदीवच्या राष्ट्रपती पदी निवड झाली. सोलिह यांना भारत समर्थक मानले गेले. त्यांच्या काळात भारत-मालदीवचे बिघडलेले द्विपक्षीय संबंध नव्याने रुळावर आले. याचं काळात भारताने मालदीवला जवळपास दोन अब्ज डॉलरची आर्थिक मदत केली. सोलिह यांच्या काळात मालदीवने चीनच्या मदतीने उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरु केली. त्यासोबतच अनेक अव्यावहारिक प्रकल्प रद्द करण्यात आले.
 
solih
सोलिह यांच्या यांच्या धोरणांमुळे बसत असलेल्या आर्थिक फटक्यामुळे चिडलेल्या चीनने यामीन यांच्या पक्षाला 'इंडिया आउट' अशा नावाने मोहिम सुरु करण्यास प्रोत्साहन दिले. या मोहिमेअंतर्गंत यामीनच्या पक्षाने भारताच्याविरोधात अफवा पसरवण्यास सुरुवात केली. यामुळे मालदीवमध्ये एक गट भारताच्या विरोधात उभा राहिला. याला पाकिस्तान आणि चीनने हवा दिली. चीनचा पैसा आणि पाकिस्तानचा धार्मिक प्रभाव मालदीवमध्ये आहे. मालदीवमधील बहुसंख्य लोक हे इस्लामच्या सुन्नी धारेला मानतात. त्यामुळे पाकिस्तानचा येथे धार्मिक प्रभाव आहे.
 
इंडिया आऊट मोहिमेला चीनने आर्थिक मदत केल्याचे, आरोप आहेत. चीनने मालदीवच्या विरोधी पक्षांशी जवळचे संबंध ठेवले. विरोधी पक्षांना सुद्धा निवडणूक लढण्यासाठी कोणता ना कोणता मुद्दा हवा होता. त्यामुळे चीन आणि मालदीवच्या विरोधी पक्षाने मिळून कृत्रिमरित्या भारत विरोधाचा मुद्दा बनवला. याच मुद्द्यावर निवडणुक लढवून २०२३ मध्ये मुइज्जू यांनी निवडणुकीत प्रचार केला. याचा त्यांना २०२३ च्या निवडणुकीत फायदा झाला. भारताचा विरोध करुन मुइज्जू मालदीवच्या राष्ट्रपती पदावर जाऊन बसले.
 
मालदीवचे विद्यमान राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू हे चीनचे समर्थक यामीन यांच्या जवळचे आहेत. यामीन भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत आहे. मोहम्मद मुइज्जू यांनी निवडणूक जिंकताच त्यांनी भारतीय लष्कराला मालदीव सोडण्यास सांगितले. पारंपारिकरित्या मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्रपती आपला पहिला परदेशी दौऱ्यामध्ये भारताला भेट देतात. पण मोइज्जू यांनी ही प्रथा मोडली. ते आपल्या पहिल्या परदेशी दौऱ्यासाठी तुर्कीये गेले. त्यानंतर ते आता पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले आहेत.

maldives
 
या दौऱ्यात ते चीनसोबत आपले संबंध मजबूत करतील. पण त्यांच्या चीन दौऱ्याआधीच त्यांच्या मंत्र्यांनी मोदींच्या विरोधात अपमानजनक टिप्पणी करुन द्विपक्षीय संबंध खराब केले आहेत. सरकारी पातळीवर तर संबंध खराब झालेच त्यासोबतच सामान्य भारतीयांनी सुद्ध मालदीववर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. मालदीवची संपूर्ण अर्थव्यवस्था पर्यटन क्षेत्रावर निर्भर आहे आणि मालदीवच्या पर्यटन क्षेत्राचा कणा भारतीय पर्यटक आहेत. २०२३ मध्ये एका वर्षात दोन लाख भारतीयांनी मालदीवला भेट दिली. त्यासोबतच २०,००० भारतीय डॉक्टर, शिक्षक, अभियंते मालदीवला आपली सेवा देतात. जर या सर्व लोकांनी मालदीवचा बॉयकॉट केल्यास, त्यांच्या इंडिया आउट मोहिमेची हवा निघून जायला वेळ लागणार नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0