कृष्णा – गोदावरी खोऱ्यातून प्रतिदिन ४५ हजार बॅरल्स कच्च्या तेलाचे उत्पादन

08 Jan 2024 17:56:56
ONGC commenced its ‘First Oil flow to FPSO’

नवी दिल्ली :
केंद्र सरकारच्या तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने (ओएनजीसी) कृष्णा गोदावरी खोऱ्यातील खोल पाण्याच्या प्रकल्पातून प्रथमच कच्च्या तेलाचे उत्पादन सुरू केले आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली. पेट्रोलियम मंत्री म्हणाले की बंगालच्या उपसागरातील कृष्णा नदीच्या खोऱ्यात केजी-डीब्ल्यूएन-९८/२ ब्लॉकमध्ये प्रथमच तेलाचे उत्पादन निघण्यास सुरूवात झाली आहे.

 
पेट्रोलियम मंत्री म्हणाले की, येथून दररोज 45 हजार बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. मात्र, ही पातळी गाठण्यासाठी काही वर्षे लागू शकतात. तसेच, येथून दररोज 10 दशलक्ष घनमीटरपेक्षा जास्त नैसर्गिक वायुचेही उत्पादन होणार आहे. देशाला ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्यासाठी हे महत्त्वाचे ठरू शकते. हा प्रकल्प देशाच्या सध्याच्या एकूण तेल उत्पादनाच्या 7 टक्के आणि नैसर्गिक वायूच्या 7 टक्के उत्पादन करणार आहे.

या प्रकल्पातून सुरुवातीला आठ ते नऊ हजार बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन केले जाणार असून 3-4 विहिरींमधून तेलाचे उत्पादन केले जाणार असून नंतर हळूहळू इतर विहिरी जोडून उत्पादनात वाढ करण्यात येणार आहे. कच्च्या तेलाची पहिली खेप ओएनजीसीची उपकंपनी असलेल्या मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडकडे पाठवली जाईल. जिथे कच्च्या तेलाची गुणवत्ता तपासली जाईल आणि त्याची श्रेणी ठरवली जाईल.

भारताच्या ऊर्जायात्रेतील महत्त्वाचे पाऊल

कृष्णा गोदावरी खोऱ्यातून कच्च्या तेलाच्या उत्पादनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त करत भारताच्या ऊर्जा प्रवासातील हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या ऊर्जा प्रवासातील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि आमच्या आत्मनिर्भर भारत धोरणास चालना देईल. याचा देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल, असेही पंतप्रधान म्हणाले.
Powered By Sangraha 9.0