क्षुद्रता अधिक लक्षणीय

08 Jan 2024 20:27:17
Article on pettiness

माणसाच्या क्षुद्रतेकडे आपले लक्ष वेधले जात असते, कारण ते वास्तविक खरेपणापेक्षा जरी दुर्मीळ असले तरी क्षुद्रता अधिक लक्षणीय आणि सनसनाटी आहे. दुर्दैवाने, क्षुद्रतेचा आणखी एक पैलू जो त्यास अधिक दृश्यमान बनवतो तो म्हणजे तशा प्रकारच्या वागणुकीला अनेकदा पुरस्कृत केले जाते. कधीकधी ते बक्षीस मूर्त असू शकते जसे की निर्दयी अनैतिक करबुडव्या व्यावसायिकाला अधिक पैसे कमवू दिले जाते किंवा एक अप्रिय कचखाऊ सहकारी पदोन्नती मिळवत असताना दिसून येतो.

एखाद्या व्यक्तीला असे वाटू शकते की आपण एखाद्या गोष्टीत नैसर्गिकरित्या चांगले असल्यामुळे, दुसर्‍याबरोबर वा प्रतिस्पर्ध्याबरोबर सह-अस्तित्वात समाधानी राहू शकत नाहीत. यामुळे ते स्वतःवर अधिक लक्ष आकर्षित करण्यासाठी किंवा संघर्ष वाढवून स्वस्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी अधमपणा करीत असतात.

लोक इतके वाईट का आहेत? या प्रश्नावर लोक इंटरनेटवर एक वादग्रस्त आरडाओरड करत असल्याचे दिसते. निनावीपणा आणि सुलभतेमुळे ही समस्या ऑनलाईन माध्यमात अधिक प्रचलित असली तरी, ती ऑनलाईन समुदायापुरती मर्यादित नाही. लोकांच्या वर्तनाचा तुमच्याशी तसा काही संबंध नसतो हे तुम्ही एकदा का समजून घेतल्यास लोक त्यांच्या पद्धतीने का वागतात हे शिकण्यासाठी एक महत्त्वाची पायरी आहे. म्हणून, जेव्हा एखादी व्यक्ती अधमपणे वागत असते, तेव्हा त्यांच्या अशा बर्‍याच भेसूर समस्या असतात त्यापैकी एखादी त्रासदायक समस्या उद्भवते. ज्यामुळे हे वर्तन होते. बहुतेक लोक अधम वा दुष्ट असतात असे नाही. तथापि, पोषक परिस्थितीत, बरेच लोक वाईट वागू शकतात.

बर्‍याचदा आपल्या सभोवतालच्या जगात खूप अधमपणे वागणारे लोक दिसतात. कारण अधम लोकांचे वर्तन चांगल्या लोकांपेक्षा अधिक लक्षवेधी असते. शिवाय ‘सत्यम शिवम सुंदरम’पेक्षा क्षुद्रपणा प्रकर्षाने लक्षात येण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या मेंदूला जगण्यासाठी त्या प्रकारे वायर्ड केले जाते. आपण आपल्या वातावरणातील नकारात्मक गोष्टींकडे विशेष लक्ष देण्यास सरावलेले असतो. कारण त्या गोष्टी आपल्याला गंभीर हानी पोहोचवू शकतात. उदाहरणार्थ, जे लोक पर्यावरणातील धोक्याबद्दल विशेष संवेदनशील असतात ते जीवंत राहतील आणि त्यांची जीन्स पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करू शकतील, असे शास्त्र म्हणते.

लोक का वाईट वागतात ? याचे एक छोटेसे उत्तर आहे: त्यांची मने दुखावलेली आहेत. याचे दीर्घ उत्तर आहे, कधीतरी, कोणीतरी-त्यांचे पालक, त्यांचे प्रियकर, प्रेयसी मित्रमंडळी यांनी त्यांना खरोखर खूप खूप दुखावले आहे - कदाचित ते वाईटाचा ओझ्याखाली चिरडले गेले असावेत आणि त्यांना अजूनही सतत भीती वाटत असावी की त्यांची भळभळणारी वेदना कधीच थांबणार नाही किंवा ती पुन्हा पुन्हा जीवंत होईल.

वस्तुस्थिती अशी आहे की, या पृथ्वीवर राहणार्‍या आपल्या सर्वांना दुखापत झाली आहे आणि आपण सर्व कधी काळी जखमी झालो आहोत. परंतु, आपण सर्वच वाईट वागत नाही. का नाही? कारण काही लोकांना हे समजले आहे की त्यांचा दुःखाचा इतिहास हा एखाद्या बळीच्या बकर्‍याच्या किंकाळ्यापेक्षा एखाद्या संघर्ष केलेल्या नायकाची गाथा असू शकतो. शेवटी, तो इतिहास ते कसा लिहितात यावर बरेच काही अवलंबून असते. ज्या क्षणी आपण स्वतःमधला किंवा इतरांमध्ये अधमपणा सहन करू लागतो, तेव्हा आपण आपली अधिकृत शक्ती चुकीच्या मार्गाने वापरत असतो. वाईट लोक अधिक लक्षात येण्याचे दुसरे कारण म्हणजे त्यांचे वर्तन सामन्यतः आक्षेपार्ह आणि त्रासदायक असते. सगळ्यांसोबत शांतपणे रास्ता ओलांडून जाणार्‍या व्यक्तीपेक्षा ट्रॅफिकमध्ये सिग्नल तोडलेल्या व्यक्तीकडे लक्ष केंद्रित करत असण्याची शक्यता आपल्या सगळ्यांमध्ये अधिक असते किंवा रस्त्यामध्ये एखादा अपघात झाला, तर मदत करण्याएवजी बघ्यांची गर्दी निरर्थकपणे तिथे उभी असते. जे वाईट घडले त्यावर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता माणसांमध्ये जास्त दिसून येते.

तथापि, माणसाचे हे क्षुद्रपण हे सर्वसामान्य प्रमाण नाही. उदाहरणार्थ, आज मीडियामध्ये कोणत्या गोष्टी बातम्या बनतात ते पाहा. बातम्यांचे स्वरूप असे असते की लोकांच्या मनावर आणि जीवनावर त्याचा पराकोटीचा परिणाम होतो. याचे एक चांगले उदाहरण म्हणजे मोठा विमान अपघात, कारण तो दुर्मीळ आहे, त्यात अनेक माणसे चुटकीसारखी दगावली गेली. त्या बातमीला व्यापक कव्हरेज मिळेल. त्यावेळी इतर चांगल्या लक्षणीय घटना घडत असल्या तरीसुद्धा त्यांची बातमी होत नाही. नक्कीच, कोणतीही नकारात्मक गोष्ट सकारात्मक गोष्टींपेक्षा अधिक मीडिया फोकस निर्माण करते. म्हणून, माणसाच्या क्षुद्रतेकडे आपले लक्ष वेधले जात असते, कारण ते वास्तविक खरेपणापेक्षा जरी दुर्मीळ असले तरी क्षुद्रता अधिक लक्षणीय आणि सनसनाटी आहे.

दुर्दैवाने, क्षुद्रतेचा आणखी एक पैलू जो त्यास अधिक दृश्यमान बनवतो तो म्हणजे तशा प्रकारच्या वागणुकीला अनेकदा पुरस्कृत केले जाते. कधीकधी ते बक्षीस मूर्त असू शकते जसे की निर्दयी अनैतिक करबुडव्या व्यावसायिकाला अधिक पैसे कमवू दिले जाते किंवा एक अप्रिय कचखाऊ सहकारी पदोन्नती मिळवत असताना दिसून येतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडून धोका वाटतो, तेव्हा त्यांची नैसर्गिक प्रतिक्रिया स्वतःचे रक्षण करण्यासाठी असू शकते आणि हे बर्‍याचदा निंदनीय असल्याचे समोर येते. एखाद्या व्यक्तीला असे वाटू शकते की आपण एखाद्या गोष्टीत नैसर्गिकरित्या चांगले असल्यामुळे, दुसर्‍याबरोबर वा प्रतिस्पर्ध्याबरोबर सह-अस्तित्वात समाधानी राहू शकत नाहीत. यामुळे त्यांना बचावात्मक असण्याची गरज वाटू शकते आणि ते त्यांच्या भूमिकेवर उभे राहण्यासाठी क्षुद्रतेचा अवलंब करू शकतात.

तथापि, ते स्वतःवर अधिक लक्ष आकर्षित करण्यासाठी किंवा संघर्ष वाढवून स्वस्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी अधमपणा करीत असतात. कधीकधी अधम लोक इतरांना वाईट वाटावे किंवा त्रास व्हावा अशा गोष्टी मुद्दामहून करतात जेणेकरून त्यांना प्रसन्न वाटेल. काही मार्गदर्शक गोष्टी आपल्या वाचनात येतात त्यापैकी येथे काही उद्धृत करूया, लोक तुमच्याशी ज्या प्रकारे वागतात ते तुमच्या पेक्षा त्यांच्या चारित्र्याबद्दल अधिक सांगतात. जेव्हा लोक तुमच्याशी असभ्य वागतात, तेव्हा ही त्यांची समस्या असते, तुमची नाही. ते वैयक्तिकरित्या घेऊ नका. इतर तुमच्याशी कसे वागतात हे तुम्ही नियंत्रित करू शकत नाही, परंतु तुम्ही त्यावर कशी काय प्रतिक्रिया देता ते मात्र तुम्ही नक्कीच नियंत्रित करू शकता.

डॉ. शुभांगी पारकर
Powered By Sangraha 9.0