मुंबई महापालिकेचा जाहिरातीसाठी ११८ कोटी खर्च!

६ महिने बेस्टच्या माध्यमातून मुंबईच्या सुशोभिकरणाचे संदेश

    07-Jan-2024
Total Views |
BMC Advertisement expenses

मुंबई :
बेस्ट बसेस आणि बस स्थानकांवर महापालिकेच्यावतीने मुंबई सुशोभीकरण प्रकल्प, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, स्वच्छता संदेश हे दि. २७ डिसेंबर २०२२२ ते दि. २६ जून २०२३ या सहा महिन्यांच्या कालावधीकरता प्रदर्शित करण्यात आले होते. या स्वच्छता संदेशाच्या जाहिरातीसाठी मुंबई महापालिकेने तब्बल ११८ कोटी रुपयांचा खर्च केला असून, हा खर्च केवळ सहा महिन्यांच्या कालावधीसाठीचा आहे.

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मागील काही महिन्यांपासून बेस्टच्या बसेसवर तसेच बस स्थानकांवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुंबई सुशोभीकरण प्रकल्प आणि स्वच्छता संदेश झळकताना दिसत आहे. या जाहिरातींच्या माध्यमातून संबंधित योजनांची माहिती जनतेला देण्यासाठी बेस्ट बस आणि स्थानकांवर संदेश प्रदर्शित करण्यात आले होते. या सर्व जाहिरातींसाठी प्रति महिना १९ कोटी ७९ लाख ६८ हजार रुपये एवढे जाहिरात एजन्सी म्हणून नेमलेल्या साईनपोस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने महापालिकेला आकारले.

त्यामुळे या जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी सहा महिन्यांसाठी ११८.७८ कोटी रुपये अतिरिक्त अनुदान म्हणून महापालिकेने खर्च केले आहे. बेस्टला मुंबई महापालिकेतर्फे ८०० कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आले असून आतापर्यंत ७८१ कोटी रुपयांचा निधी महापालिकेने बेस्ट उपक्रमाला अदा केला आहे.