युरोपातील बदक मुंबईत दाखल

06 Jan 2024 17:34:15


winter migration duck



मुंबई : हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी अनेक परदेशी पक्षी भारतात स्थलांतर करत असतात. दरवर्षीप्रमाणे, यंदाही पाणपक्षी प्रजातीतील विविध प्रजातींचे बदक मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये गार्गनी, कॉमन टील, चक्रवाक (ब्राम्हिणी बदक), गडवाल, थापट्या बदक अशा अनेक प्रजाती युरोपातुन मुंबईत दाखल झाल्या असून त्यांचे पक्षीप्रेमींना दर्शन झाले आहे.

हे पक्षी तानसा, बारवी धरण, डोंबिवली, उरण अशा काही भागांमध्ये दिसले आहेत. तानसा येथे दरवर्षी शेंडी बदक (Tufted Duck) दिसतात, लालसरी (Common Pochard) आणि युरेशियाई पतेरा (Eurasian Wigeon) या दोन्ही प्रजातींच्या बदकाचे तानसा आणि बारवी धरण येथे दर्शन होते. फेरुजिनस या बदकाचे डोंबिवली, उरण आणि विरारमध्ये ही गेल्या काही वर्षांत दुर्मिळ रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत. त्याचबरोबर, कलहंस (ग्रेलाग गूज) या बदकाचे काही महिन्यांपूर्वी पालघरमध्ये शेवटचे दर्शन झाल्याचे पक्षीअभ्यासक सांगतात. याव्यतिरिक्त मुंबईमध्ये हळदी कुंकू बदक (Spot billed duck), अडाई, मराल (Lesser Whistling Teal) आणि कोम्ब डक या बदकांच्या मुंबईत स्थानिक प्रजाती वास्तव्यास आहेत.

साधारणपणे, ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत हे पक्षी दरवर्षी दिसत असून जवळजवळ संपुर्ण हिवाळा ते या प्रदेशात व्यतीत करतात. या पक्ष्यांना अधिवास नुकसानाबरोबरच शिकारीचा ही मोठ्या प्रमाणावर धोका आहे. अजूनही या परदेशी पाहूण्यांची अनेक ठिकाणी मांसाहारासाठी शिकार केली जाते.

"डोंबिवली परिसरामध्ये यातील अनेक प्रजातींचे हजारोंच्या संख्येने दर्शन व्हायचे. पण, आता ती खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजेच ५००० वरुन ते अगदी १००-२०० च्या संख्येनेच दिसतात. अधिवासाचे नुकसानामुळे त्यांच्या स्थलांतरावर मोठा परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले असून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे."

- प्रथमेश देसाई
पक्षी अभ्यासक आणि निरिक्षक, डोंबिवली




Powered By Sangraha 9.0