भारताचं सुर्याजवळ यशस्वी पाऊल! 'आदित्य एल-१' चे नियोजित कक्षेत यशस्वी प्रक्षेपण
06 Jan 2024 16:46:18
मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने आणखी एक इतिहास रचला आहे. भारताची पहिली सौर मोहिम आदित्य एल-१ यशस्वीपणे पार पडली आहे. आदित्य एल १ लांग्रेज पॉईंटवर (एल-१) पोहोचवण्यात इस्त्रोला यश आले आहे. याद्वारे सुर्याचा जवळून अभ्यास करणे शक्य होणार आहे.
२ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीहरिकोटा येथून आदित्य एल-१ चे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यानंतर आता ६ जानेवारी २०२४ रोजी आदित्य एल १ ला लांग्रेज पॉईंटच्या हॅलो ऑर्बिटमध्ये पोहोचवण्यात इस्त्रोला यश आले आहे. या उपग्रहाला पृथ्वीपासुन लॅग्रेंज पॉइंटपर्यंत पोहचण्याकरिता ४ महिन्यांचा कालावधी लागला.
पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या लांग्रेज पॉईंटवर पृथ्वी आणि सुर्यामध्ये शुन्य गुरुत्वाकर्षण शक्ती असते. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-१ ही भारताची पहिली अंतराळ मोहीम आहे. याद्वारे पहिल्यांदाच सुर्याचा जवळून अभ्यास केला जाणार आहे.
फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळणार सूर्याची पहिली झलक
आदित्य एल-१ वरून सूर्याचे पहिले चित्र फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळणार आहे. VELC ची निर्मिती भारतीय खगोल भौतिकी संस्थेने केली असून हे VELC सूर्याचे एचडी फोटो घेईल. त्यानंतर एल-१ पर्यंतचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आदित्यचे सर्व पेलोड्स सुरु होऊन त्यातील सर्व उपकरणे सक्रिय होतील. याद्वारे सुर्याचा अभ्यास केला जाणार आहे. याआधी, यासर्व यंत्रणांची इस्त्रोकडून चाचणीदेखील घेण्यात येणार आहे. एकंदरीत, आदित्य एल-१ द्वारे सुर्याविषयी कुठल्या अज्ञात गोष्टींचा उलगडा होणार याकडे खगोलप्रेमींचे लक्ष असणार आहे.