बखर सावरकरांची (मध्य विभाग)

06 Jan 2024 20:05:35
Book reiview of Bakhar Savarkaranchi

'बखर सावरकरांची’चा ‘पूर्वार्ध’ प्रकाशित केल्यानंतर ‘उत्तरार्ध’ प्रकाशित करावा, असा मानस प्रकाशकांचा होता. परंतु, सावरकरांच्या कार्याचे तीन टप्पे लेखकाने विभागून सांगितले. पहिला म्हणजे सशस्त्र क्रांती, द्वितीय तो सामाजिक समरसतेचा आणि तिसरा हिंदुत्वनिष्ठ राजकीय कार्याचा. तेव्हा दुसरा भाग त्यांच्या सामाजिक क्रांतिपर्वावर आधारित आहे. १९२४ पासून १९३७ पर्यंतचा कालावधी यात आहे. सावरकरांचे नाशिक आणि अंदमान येथील वास्तव्य बहुतेकांना माहिती असते. परंतु, रत्नागिरीत त्यांनी केलेल्या कार्याचा आवाकासुद्धा तितकाच मोठा आहे. या कालावधीवर प्रकाश टाकणारा बखरीचा हा दुसरा भाग.

त्यांच्या प्रारंभीच्या काळातील सशस्त्र क्रांतीपेक्षा या पर्वाला अजिबात कमी लेखता येणार नाही. तेवढ्याच ताकदीचे, किंबहुना काकणभर जास्तच महत्त्वाचे हे कार्य. या काळात त्यांनी भेदभाव निर्मूलन, सहभोजन, परधर्मात गेलेल्यांची शुद्धी करून त्यांना पुन्हा हिंदू करून घेण्याचे कार्य, लेख व्याख्याने, नाट्यलेखन, अखिल हिंदू गणेशोत्सव आणि उपहारगृह, पतितपावन मंदिर, स्वदेशीचा प्रचार अशी अनेक समाजहिताची कामे त्यांनी या काळात केली.
 
स्वातंत्र्यवीरांना ‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी केव्हापासून मिळाली, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी विनायक सावरकरांचे नाव कसे पुढे आहे आणि अशा अनेक प्रश्नांची विस्ताराने उत्तरे या बखरीतून मिळतात. परंतु, एक गोष्ट खटकते, ती म्हणजे प्रत्येक घटना सविस्तर वर्णन करून सांगण्याचा प्रयत्न करता आला असता; परंतु लहान-लहान घटनांना एकत्र करण्याचे कसब या पुस्तकातून वापरलेले दिसते. एखाद्या घटनेचा विस्तार सांगताना, त्यांनी केलेल्या रचनाही मधून-मधून पेरलेल्या आहेत. सावरकरांच्या केवळ राजकीय किंवा केवळ साहित्यिक चळवळीवर हे पुस्तक भाष्य करत नाही.

मला काय त्याचे अर्थात ‘मोपल्यांचे बंद’, सावरकरांची पं. मोतीलाल नेहरूंवर हिंदू राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरून टीका, धाक्रस कुटुंबाला पुन्हा हिंदू करून घेतले, ऑगस्टीन डिसोझा स्वेच्छेने आनंद नाईक झाला, तात्यारावांचे तिसरे नाटक उत्तरक्रिया, अखिल हिंदू उपहारगृह, तात्यारावांनी मनुस्मृतीवरील व्याख्याने, गोरक्षण हवे, केवळ गोपूजन नको अशा अनेक भागांचा समावेश आहे. महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यात झालेला संवादही या बखरीत लेखकाने घेतला आहे. या छोट्याशा पुस्तिकावजा बखरीत समग्र सावरकर विचारांचे दर्शन करण्याची ताकद आहे, हे मात्र वाखाणण्याजोगे.

रत्नागिरीत हिंदू महासभेची स्थापना करण्यापासून त्यांच्या कार्याचा आढावा या दुसर्‍या भागात आहे. त्यांना ‘स्वातंत्र्यवीर’ पदवी मिळाली, तो हाच काळ. ही पदवी लोकमान्यतेतून मिळालेली आहे. प्लेग, त्यांच्यावर घातले गेलेले निर्बंध अशा अनेक घटना या भागाच्या सुरुवातीच्या लेखांत आहेत. सावरकर रत्नागिरीच्या तुरुंगातून सुटले इथंपासून हे पर्व आहे. आपण पाहतो, सावरकरांवर उगाच चिखलफेक करणारे अनेक लोकसमूह आहेत. परंतु, त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितल्यावर त्यांना ते देता येत नाही. या सर्व आरोपांचे स्पष्टीकरणसुद्धा वेळोवेळी या बखरीतून मिळते. ज्यांना ‘समग्र सावरकर’ दहा खंड वाचणे शक्य नसेल, त्यांच्यासाठी या तीन बखरी अत्यंत उपयुक्त आहेत.
 
हे पर्व समाज प्रबोधनाचे आहे. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वावर ज्या दोन व्यक्तींचा मोठा प्रभाव होता, ते म्हणजे टिळक आणि आगरकर. हे पर्व आगरकरांच्या शिकवणीवर चालत असावे, असे आहे. राजकारणातील सक्रिय सहभाग घेता येत नाही, तेव्हा समाज सुधारणा तरी करावी, हा विचार. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजाने सुदृढ असणेसुद्धा गरजेचे. राष्ट्रासाठी वाहिलेल्या या आयुष्यात राजकारणात सक्रिय सहभाग घेता येणार नाही, तेव्हा काय करावे, या मिळालेल्या आयुष्याचे असा विचार त्यांना चालत होता. तेव्हाची त्यांची मनस्थिती लेखकाने उत्तम विशद केली आहे. या बखरीतून त्यांच्याविषयी सविस्तर आकलन होते. बखरीचा पुढील भाग ’उत्तरार्ध-हिंदुत्वनिष्ठ राजकीय पर्व’ लवकरच प्रकाशित होत आहे. पहिल्या दोन पुस्तकांचे वाचन झाल्यावर तिसर्‍या पुस्तकाच्या प्रतीक्षेत आहोत.

पुस्तकाचे नाव : बखर सावरकरांची (मध्य विभाग) सामाजिक क्रांतिपर्व
लेखकाचे नाव : अ‍ॅड. आदित्य रुईकर
प्रकाशन : दिवाकर प्रकाशन
प्रथमावृत्ती : १५ ऑगस्ट, २०२३
पृष्ठसंख्या : १५८
मूल्य : ३०० रु.
Powered By Sangraha 9.0