एकनाथ खडसे राजकारणातील नासका कांदा; प्रविण दरेकरांचे प्रत्युत्तर

31 Jan 2024 12:47:07

Pravin Darekar & Eknath Khadse


मुंबई :
एकनाथ खडसे हे राजकारणातील नासका कांदा आहेत. ते भविष्यातील राजकारणात कितपत तग धरतील अशी स्थिती असल्याची टीका भाजप विधानपरिषद गटनेते आमदार दरेकर यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात बेताल वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला आता प्रविण दरेकरांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
 
प्रविण दरेकर म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत चेहरा आहेत. एकनाथ खडसे यांचे राजकारण महाराष्ट्राने पाहिले आहे. ते वैफल्यग्रस्त झालेत. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे नेतृत्व शिल्लक राहिलेले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात द्वेशाने, मत्सराने बोलणे यापलीकडे ते दुसरे काहीच करू शकत नाहीत."
 
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना दरेकर म्हणाले की, "रामावर टीका करणाऱ्यांना जनतेने उलटे केले आहे. रामाचे उलटे 'मरा' होते म्हणून आज ईडीच्या फेऱ्यात ते मरताना दिसत आहेत. ईडी ही स्वायत्त संस्था आहे हे अनेकदा सिद्ध झाले आहे. तक्रारीत तथ्य असेल तर त्या अनुषंगाने तपास यंत्रणा काम करत असतात. कोविड सारख्या गंभीर स्थितीत खिचडी, बॉडी बॅग, औषधांमध्ये पैसे खाणार असाल तर नियती कधीच तुम्हाला माफ करणार नाही. म्हणून या गंभीर स्थितीत झालेल्या घोटाळ्या संदर्भात ही चौकशी आहे. ईडीने सखोल चौकशी करून कठोर कारवाई केली पाहिजे," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "४०० पार करण्याची स्थिती आणि वातावरण देशात आहे. संजय राऊत बोलघेवडे आहेत. बोलण्यापलीकडे त्यांची कृती शून्य आहे. त्यांना फार महत्व देण्याची गरज नाही. केजरीवाल, ममता बॅनर्जी स्वतंत्रपणे लढताहेत. नितीश कुमार जो खऱ्या अर्थाने एनडीएचा चेहरा बनू शकले असते त्यांनी आज भाजपासोबत युती केली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची पूर्णपणे त्रेधातिरपट उडालेली आहे. महाराष्ट्रात संजय राऊत यांनी उरले सुरलेले अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करावे. अख्खी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेली आहे," असे ते म्हणाले. तसेच स्वतःचे अस्तित्व शोधा मग रामावर बोला असा टोलाही दरेकरांनी राऊतांना लगावला.
 
"संजय राऊत यांच्याबाबतीत काय प्रकरण झाले हे महाराष्ट्राने पाहिले आहे. एका महिलेचा छळ कशाप्रकारे झाला. तिचे स्टेटमेंट, तक्रारी महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्याकडे एकबोट दाखवताना संजय राऊत यांनी आपल्याविषयी काय प्रतिमा निर्माण झाली आहे, त्याचे आत्मपरीक्षण करावे. तुम्ही काय आहात ते जनतेला नीट माहित आहे. संजय राऊत यांच्या भंपक वक्तव्यांना जनता काडीची किंमत देत नसल्याचेही दरेकर म्हणाले."
 
दरेकर पुढे म्हणाले की, "इंडिया आघाडी प्रकाश आंबेडकर यांना किंमत देत नाही. त्यामुळे ते चिडून आहेत. प्रकाश आंबेडकर हे महत्वाचे नेते आहेत. त्यांना सन्मानाने बोलवून चर्चा करणे अपेक्षित असताना त्यांना कस्पटा समान हे लेखताहेत. त्याच पद्धतीचे उत्तर प्रकाश आंबेडकर देत आहेत. प्रकाश आंबेडकरांनाही दिसतेय देशपातळीवर काय चालले आहे. त्यामुळे देशपातळीवर इंडिया आघाडीची जी अवस्था झाली तशीच महाराष्ट्रातही होणार आहे. कितीही कडबुळे बांधलेत तरी देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे नेतृत्व देण्याचा विचार नक्की केला असून याचे प्रत्यंतर देशभरात दिसत आहे. पंतप्रधान मोदी ४०० पार करत तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील," असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.

Powered By Sangraha 9.0