मुंबई (विशेष प्रतिनिधी): महाबळेश्वरमध्ये पांढरे शेकरु (Indian Giant Squirrel) म्हणजेच शास्त्रीय भाषेतील अल्बिनो शेकरुचे दर्शन झाले आहे. उडती खार म्हणुन ओळखला जाणारा हा प्राणी महाराष्ट्राचा राज्य प्राणी (Indian Giant Squirrel) आहे. रॅटुफा इंडिका असे शास्त्रीय नाव आणि इंडियन जायंट स्क्विरल (Indian Giant Squirrel) या इंग्रजी नावाने ओळखला जाणारा हा प्राणी भीमाशंकर भागात चांगल्या संख्येने दिसुन येतो.
अनेकदा काही प्रमाणात किंवा अंशतः पांढऱ्या पडलेल्या प्राणी किंवा पक्ष्यांचे दर्शन होते. त्वचेमध्ये मेलानिन नावाच्या घटकाच्या होणाऱ्या स्त्रावावर त्वचेचा रंग अवलंबुन असतो. मेलानिनचा स्त्राव कमी प्रमाणात झाल्यास त्वचा पांढरी दिसण्यास सुरूवात होते. यामुळे प्राणी अंशतः पांढरे होतात. मेलानिनचे प्रमाण अतिप्रमाणात कमी असेल तर प्राणी किंवा पक्षी पुर्णपणे पांढरे दिसतात. यालाच अल्बिनो संबोधले जाते. याउलट अनेकदा मेलानिनचा स्त्राव जास्त प्रमाणात झाल्यास प्राणी पक्ष्यांची त्वचा काळी दिसु लागते. थोड्याफार फरकाने मेलानिनचा स्त्राव अधिक झाल्यास त्वचेच्या मुळ रंगापेक्षा काळे दिसु लागतात. यामध्ये काही प्रमाणात असेल तर अंशतः तर काहीवेळा पुर्णपणे काळी त्वचा असलेल्या जीवांचे दर्शन होते. यांना मेलानिस्टिक संबोधले जाते.
महाबळेश्वरमध्ये दिसलेल्या या शेकरुची त्वचा पुर्णपणे पांढरी असून या अल्बिनो शेकरुचे दुर्मिळ दर्शन साधारणतः या कालावधीमध्ये दरवर्षी होते. आययुसीएनच्या यादीत लिस्ट कन्सर्न वर्गात येणाऱ्या शेकरुंची (Indian Giant Squirrel) संख्या मात्र आता झपाट्याने कमी होत आहे.