छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ३ जवान हुतात्मा,१४ जखमी!

30 Jan 2024 20:33:07
3 CRPF personnel killed, 14 injured in Chhattisgarh Naxal attack

रायपुर
: छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील टेकलगुडेम पोलीस कॅम्पवर नक्षलवाद्यांनी दि. ३० जानेवारी रोजी हल्ला केली. या हल्ल्यात तीन जवान हुतात्मा झाले आहेत, तर १४ जवान जखमी झाले आहेत. जखमींना जगदलपूर रायपूर येथे नेण्यात आले आहे. यातील ४ जवानांची प्रकृती गंभीर आहे. तर इतरांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. याआधी ही २०२१ मध्ये ही नक्षलवाद्यांनी टेकलगुडेममध्येच हल्ला केला होता, ज्यामध्ये २३ जवान हुतात्मा झाले होते.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० जानेवारी २०२४ रोजी सुरक्षा दलाचे एक पथक जोनागुडा-अलिगुडा परिसरात शोध मोहीम राबवत होते. या टीममध्ये सीआरपीएफचे कोब्रा, एसटीएफ आणि डीआरजीचे जवान होते. दुपारी तीनच्या सुमारास घातपाती हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पथकावर गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलांनीही आपली पोझिशन घेतली आणि दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला.

मुळात जगरगुंडा पोलीस स्टेशन हद्दीतील टेकलगुडेम गावात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली. टेकलगुडेम गावात नवीन पोलीस छावणी सुरू करण्यात आली आहे. या कॅम्पमधून सुरक्षा दल शोध मोहिमेसाठी बाहेर पडले होते. यानंतर टीमवर माओवाद्यांनी हल्ला केला. तब्बल चार तास चाललेल्या या चकमकीत सुरक्षादल भारी पडत असल्याचे लक्षात येताच नक्षलवादी जंगलाच्या आडून पळून जाण्यात यशस्वी झाले.

याआधी टेकलगुडा येथेच ३ एप्रिल २०२१ रोजी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २३ जवान हुतात्मा झाले होते. तर ३५ हून अधिक जखमी झाले होते. या चकमकीत सुमारे ३५० ते ४०० नक्षलवादी सामील होते. त्यात माओवाद्यांचे बडे नेतेही उपस्थित होते. BGL (बॅरल ग्रेनेड लाँचर) ने सैनिकांवर गोळीबार केला.
 
इतकेच नाही तर या काळात नक्षलवाद्यांनी डीआरजी, सीआरपीएफ आणि कोब्रा बटालियनच्या जवानांची शस्त्रेही लुटली. कोब्रा बटालियनचे शिपाई राकेश्वर सिंह मन्हास यांचेही नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. मात्र, अपहरणाच्या सहा दिवसानंतर बस्तरचे गांधी म्हणून ओळखले जाणारे स्वातंत्र्यसैनिक धरमपाल सैनी यांच्या मध्यस्थीनंतर नक्षलवाद्यांनी राकेश्वर सिंगची सुटका केली.

तीन दिवसांपूर्वी चिंतागुफा परिसरात सक्रिय असलेल्या दोन महिला आणि एक पुरुष नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले होते. यातील एका महिला नक्षलवाद्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. दि.२७ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या ५० व्या बटालियनच्या अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले.
 
सीआरपीएफचे दुसरे कमांडिंग अधिकारी दुर्गाराम यांनी सांगितले की, पोलिसांच्या पुणे नरकोम मोहिमेने प्रभावित होऊन दुधी सुकडी (५३), दुधी देवे (३८) आणि माडवी हडमा (२६) यांनी आत्मसमर्पण केले आहे. यातील दुधी देवेवर एक लाख रुपयांचे बक्षीस होते. तिघांनाही प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली. याशिवाय त्यांना राज्य शासनाच्या पुनर्वसन धोरण योजनेचा लाभ दिला जाणार आहे.


 
Powered By Sangraha 9.0