राधाकृष्ण विखे पाटील मानद 'डॉक्टर ऑफ सायन्स'ने सन्मानित!

29 Jan 2024 17:33:38

Radhakrishna Vikhe Patil


मुंबई :
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे मानद 'डॉक्टर ऑफ सायन्स'ने सन्मानित करण्यात आले. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत सोमवार, दि. २९ जानेवारी रोजी या विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारोह संपन्न झाला. त्यावेळी ६ हजार ८९५ स्नातकांना कृषि क्षेत्रातील पदव्या व पदव्युत्तर पदव्या प्रदान करण्यात आल्या.
 
या दीक्षांत समारोहाला भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. राजेंद्र सिंह परोदा, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रशांत कुमार पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी राज्याचे कृषि मंत्री व विद्यापीठाचे प्रकुलपती धनंजय मुंडे यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. या कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री तसेच अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महिकोचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले व सह्याद्री फार्मसीचे संचालक विलास शिंदे यांना मानद 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी प्रदान करण्यात आली.
 
शेती हा आपल्या देशाचा मुख्य आधार आहे आणि ५८ टक्क्यांहून अधिक लोक उपजीविकेसाठी शेतीवर आहेत असे सांगून कृषि क्षेत्राचे भविष्य घडवण्यात कृषी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची आहे, असे राज्यपालांनी सांगितले. २०३० पर्यंत गरीबी आणि भुकेचे निवारण करण्याचे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठणे हे देशापुढील आवाहन आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
 
नवी प्रेरणा मिळाली!
 
याविषयी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी यांच्यावतीने ३७ व्या पदवीदान समारंभात 'डॉक्टर ऑफ सायन्स' या मानद पदवीने मला सन्मानित करण्यात आले. माझ्या सामाजिक जीवनात मिळालेल्या प्रत्येक पदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत केला. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना २२ ऑक्टोबर १९७८ आणि पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांना २९ नोव्हेंबर २०१२ रोजी कृषी विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन सन्मानित केले होते. त्यांच्या संस्काराचा आणि कार्याचा वारसा पुढे घेऊन जाताना शैक्षणिक आणि समाजाप्रति केलेल्या कार्याचा हा मी बहुमुल्य सन्मान समजतो. एका माजी विद्यार्थ्याचा कृषी विद्यापीठाकडून झालेला सन्मान खूपच अभिमानास्पद आहे. या मानद पदवीने यापुढील कार्यास एक नवी प्रेरणा मिळाली आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Powered By Sangraha 9.0