इरफान हबीबांची अशी ही बदमाशी...

29 Jan 2024 21:36:55
irfan habib
 
इरफान हबीब आणि मंडळींनी इतिहासाचे अभ्यासक्रम, पुस्तके, अकादमिक विश्व यांमध्येही आपले विकृत विचार पेरले. परिणामी, हिंदूंच्या इतिहासाबद्दल न्यूनगंड आणि संताप मनात असलेल्या किमान दोन पिढ्या या मंडळींनी तयार केल्या. मात्र, आता ‘कालचक्र’ बदलले असून, हिंदू समाज इतिहासाच्या नावे चाललेल्या बदमाशीस उधळून टाकण्यास सज्ज झाला आहे!
 
भारताच्या इतिहासात हिंदू हा नेहमीच किरकोळ होता, असा समज पसरविण्यासाठी देशात इतिहासकारांची एक टोळी दीर्घकाळपासून कार्यरत आहे. त्यामध्ये इरफान हबीब, रोमिला थापर, आर. एस. शर्मा आणि डी. एन. झा यांसारख्या हिंदूद्वेष्ट्या इतिहासकारांचा समावेश. भारताच्या स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९४७ सालानंतर डावे, पुरोगामींना अनुकूल असा सोयीचा इतिहास लिहिण्याच्या प्रक्रियेत या चार जणांचा तर सिंहाचा वाटा. इतिहास लेखन करताना, या चारही इतिहासकारांनी डाव्या विचारांचा अजेंडा अतिशय बेमालूमपणे प्रत्येक घटनेत मिसळला. आपल्या कामात या चारही इतिहासकारांनी एवढा कावेबाजपणा दाखवला की, हिंदू समाजाला दोषी ठरविणे, त्यांना सहज शक्यही झाले. अर्थात, त्यांना स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय नेतृत्वाचीही मोठ्या प्रमाणावर साथ मिळाली. देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी अशा प्रकारच्या तथ्यांची सोयीस्कर मोडतोड करुन मांडणार्‍या इतिहासकारांना एक प्रकारचे मोकळे रानच दिले. तत्कालीन नेतृत्वाची भूमिकादेखील या इतिहासकारांना साजेशीच होती. तत्कालीन नेतृत्वास जागतिक नेता व्हायची हौस असल्याने, ‘जे-जे हिंदूंचे ते-ते मागास आणि टाकाऊ’ असा समज त्यांचा मनात दृढ होता. त्यातूनच त्यांनी सरदार पटेल यांच्या सोमनाथ जीर्णोद्धाराच्या महान कार्यास भरपूर विरोध केला. मात्र, प्रथम सरदार पटेल आणि त्यानंतर कन्हैयालाल मुन्शी यांनी नेहरूंचा विरोध डावलून सोमनाथ जीर्णोद्धाराचे महान कार्य पूर्णत्वास नेलेच.
 
तत्कालीन नेतृत्वाने तमाम सरकारी यंत्रणा या मंडळींच्या दावणीला बांधली, जेणेकरून त्यांना मनमोकळेपणाने इतिहासलेखन म्हणजेच इतिहासाचे विद्रुपीकरण करता यावे. मात्र, इतिहासलेखनाच्या नावे या मंडळींनी हिंदूंना बदनाम करून यथेच्छ उच्छाद मांडला. हिंदू धर्म, हिंदू परंपरा, हिंदू संस्कृती, हिंदूंचा इतिहास आणि त्यातही प्रामुख्याने परकीय आक्रमक मुघलांनी उद्ध्वस्त केलेल्या अयोध्या, काशी आणि मथुरा या पवित्र श्रद्धास्थानांचा इतिहास विकृत करण्यातच यांची अख्खी हयात गेली. परकीय आक्रमक मुघलांनी तर भारतातील हजारो देवस्थाने नष्ट केली, विकृत केली. मात्र, हिंदू समाज अयोध्या, काशी आणि मथुरा यांना मुक्त करण्यासाठी हिंदू समाज अधिक आग्रही आहे. त्यापैकी अयोध्येसाठी तब्बल ५००हून अधिक वर्षे हिंदूंनी लढा दिला, तो याच महिन्यात पूर्णत्वास गेला. मात्र, अयोध्या प्रकरणामध्ये इतिहासाचा अनर्थ करण्यात इरफान हबीब आणि त्यांच्या मित्रमंडळींनी जीवाचे रान केले होते. मात्र, हिंदू समाजाने सामाजिक-राजकीय लढा दिला, त्यासोबतच ’भारतीय पुरातत्त्व विभागा’ने अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीचे वैज्ञानिक पद्धतीने उत्खननही केले होते. त्यामध्येही येथे मंदिरच असल्याचे सिद्ध झाले होते. मात्र, ते पुरावेही नाकारण्याचे कृत्य या कथित इतिहासकारांनी केले होते.
 
आता तसाच प्रकार काशीविश्वनाथ प्रकरणात या इतिहासकारांनी करण्यास प्रारंभ केलेला दिसतो. परकीय आक्रमक औरंगजेबाने काशीविश्वनाथाचे मंदिर उद्ध्वस्त केले होते. मंदिराच्याच भिंतींचा वापर करून, त्यावर विवादास्पद ढाँचा (कथित मशीद) बांधून हिंदूंचा मानभंग करण्याचा प्रयत्न केला होता. हिंदू समाज ज्ञानवापीसाठीदेखील शेकडो वर्षांपासून लढा देत असून, तो लढा आता निर्णायक टप्प्यात आला आहे. ज्ञानवापीमधील विवादास्पद ढाँच्याचे ’भारतीय पुरातत्त्व विभागा’ने वैज्ञानिक सर्वेक्षण केले असून, त्याचा अहवाल नुकताच सार्वजनिक करण्यात आला. त्यामध्ये मंदिर असल्याचे शेकड्याने पुरावे प्राप्त झाले आहेत. सध्या असलेल्या ढाँच्याच्या बांधकामापूर्वी येथे अतिशय भव्य असे हिंदू मंदिर होते. याचाच अर्थ येथे असलेल्या मशिदीचे बांधकाम होण्यापूर्वी येथे अतिशय मोठे असे हिंदू मंदिर होते, असे त्या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यासोबतच तथाकथित मशिदीची पश्चिमेकडील भिंत ही अगोदरच अस्तित्वात असलेल्या हिंदू मंदिराचा भाग आहे. ही भिंत हिंदू पद्धतीच्या चिन्हांनी सुशोभीत करण्यात आल्याचे दिसले आहे. सध्याच्या ढाँचाच्या तळघरात हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती आहेत, ज्या मातीत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असेही अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
 
असे असतानाही इतिहासकार म्हणवणार्‍या इरफान हबीब यांनी आता या सर्वेक्षणावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अर्थात, इरफान हबीब जे काही म्हणाले, ते पाहता ‘निर्लज्ज’ शब्दासही लाज वाटावी. इरफान हबीब म्हणाले की, ”ज्ञानवापी प्रकरणात ’एएसआय’च्या सर्वेक्षणाची गरज नव्हती. ही गोष्ट (मंदिर असणे) आलमगीरच्या (औरंगजेब) पुस्तकातही नमूद आहे. जर तुम्ही सर जदुनाथ सरकार यांचे पुस्तक वाचले असते, तर तुम्हाला सर्व काही समजले असते. आता ज्यांनी अभ्यास केला नाही, ते अशिक्षित आहेत. त्याचे काय करावे?” त्यापुढे जाऊन हबीब म्हणतात की, ”पण, देशात हे असेच चालू राहणार का? मशिदी पाडून मंदिरे बांधण्याची प्रक्रिया किती दिवस चालणार? जेथे मशिदी आहेत, त्या पाडून मंदिरे बांधावीत का? बाबरी मशीद प्रकरणातही असेच घडले. बाबरी मशीद वादात मंदिर अस्तित्वात असल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नव्हता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की, बाबरीऐवजी तिथे मंदिर होते.”
 
अर्थात, इरफान हबीब यांची ही बदमाशी नवीन नाही. हबीब आणि त्यांच्या मित्रमंडळींची संपूर्ण हयात अशा प्रकारची बदमाशी करण्यात गेली आहे. या मंडळींनी भारतीय इतिहासाला विकृत करण्याची एकही संधी सोडलेली नाही. धडधडीतपणे पुरावे दिसत असूनही ते नाकारून आपलाच हिंदूविरोधी अजेंडा रेटणे म्हणजेच इतिहास, अशी स्थिती देशात निर्माण करण्यात आली होती. हबीब आणि मंडळींनी इतिहासाचे अभ्यासक्रम, पुस्तके, अकादमिक विश्व यांमध्येही आपले विकृत विचार पेरले. परिणामी, हिंदूंच्या इतिहासाबद्दल न्यूनगंड आणि संताप मनात असलेल्या किमान दोन पिढ्या या मंडळींनी तयार केल्या. मात्र, आता ‘कालचक्र’ बदलले असून, हिंदू समाज इतिहासाच्या नावे चाललेल्या बदमाशीस उधळून टाकण्यास सज्ज झाला आहे.
Powered By Sangraha 9.0