"तू धर्माचा अपमान करत आहेस" - रामललाच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या शबनमला कट्टरपंथी महिलांनी दिला त्रास

    28-Jan-2024
Total Views |
 Shabnam Sheikh
 
लखनौ : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी रामललाच्या दर्शनासाठी मुंबईहून अयोध्येला पायी निघालेल्या शबनम शेख हिच्याशी उत्तर प्रदेशातील अमेठी येथे काही कट्टरपंथी महिलांनी गैरवर्तन केले. कट्टरपंथी महिलांनी तिच्या पेहरावावर आक्षेप घेतला. शबनमला त्रास देणाऱ्या महिलांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणारी शबनम शेख ३७ दिवसांपूर्वी आपल्या दोन मैत्रिणींसोबत रामललाच्या दर्शनासाठी पायी निघाली होती. या प्रवासात तिने बुरखा परिधान केला आहे आणि हातात भगवा ध्वज घेतला आहे. ती शनिवारी (२७ जानेवारी २०२४) अमेठीतील जगदीशपूरला पोहोचली.
 
अयोध्येकडे जात असताना पांढऱ्या रंगाच्या गाडीतील काही मुस्लिम महिला आल्या आणि त्यांच्याशी भांडू लागल्या. शबनमकडून धर्माचा अपमान होत असल्याचे या महिलांनी सांगितले. शबनमने बुरखा परिधान केल्याबद्दलही त्यांनी आक्षेप घेतला. शबनमनेही कारमधील महिलांना उत्तर दिले. त्यांनी महिलांना बुरखा काढून साडी नेसायची का, अशी विचारणा केली.
 
शबनमसोबत झालेल्या या गैरवर्तनाचा व्हिडिओही समोर आला आहे. शबनमने तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शबनमला त्रास देणाऱ्या महिलांवर कारवाई केली आहे. छळ करणाऱ्या महिलेला पोलिसांनी चालान बजावले असून वाहन जप्त केले आहे.