राजदत्त : व्रतस्थ दिग्दर्शक

27 Jan 2024 22:19:12
Padmabhushan to Film Director Rajdutt

भारत सरकारच्यावतीने २०२४च्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेल्या ’पद्म’ पुरस्कारात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना ’पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला, हा अतिशय उचित गौरव आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलूत्व दिग्दर्शक म्हणून राजदत्त यांची वाटचाल खूपच मोठी आणि उल्लेखनीय! चित्रपट, माहितीपट, लघुपट असा त्यांचा उल्लेखनीय प्रवास. त्याचाच या लेखातून घेतलेला आढावा...


एक वेगळी आठवण. वांद्य्रातील मेहबूब स्टुडिओत मधुकर रुपजी, सुधा चितळे आणि विनय नेवाळकर निर्मित ’ट्रॉयका फिल्म कम्बाईन’ बॅनरखालील राजदत्त दिग्दर्शित ’पुढचं पाऊल’ या चित्रपटाचे चित्रीकरण सत्र सुरू असतानाची गोष्ट. मेहबूब स्टुडिओत सेट लावून, एखाद्या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण हे सुषमा शिरोमणीला शक्य असे. म्हणूनच ’पुढचं पाऊल’चे तेथील चित्रीकरण हे वैशिष्ट्यपूर्ण होते आणि त्याच सेटच्या अगदी बाजूच्याच सेटवर ’संजोग’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात जितेंद्र व जयाप्रदा एका गाण्याच्या चित्रीकरणात भाग घेत होते. आणि मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांना शूटिंग रिपोर्टिंगसाठी आमंत्रित केले असतानाच, जितेंद्रला समजले, शेजारीच राजदत्त शूटिंग करताहेत. त्याने लगेचच जयाप्रदाला सांगितले की, ”तुझी आपल्या क्षेत्रातील एका अलौकिक व्यक्तिमत्त्वाची भेट करून देतो.” तो जयाप्रदाला घेऊन ’पुढचं पाऊल’च्या सेटवर गेला आणि त्या दोघांनी राजदत्त यांना वाकून नमस्कार करत, त्यांचे आशीर्वाद घेतले.

राजदत्त यांना त्यांच्या गुणवत्तेवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले. राज्य सरकार व ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ यांत त्यांनी उल्लेखनीय ठसा उमटवला. त्याबरोबरच असा आदरही त्यांनी प्राप्त केला, हे आवर्जून सांगायलाच हवे. चित्रपट हे फक्त लोकरंजनाचे माध्यम नसून, ते लोकशिक्षणाचे माध्यम आहे, ही धारणा मनात ठेवून पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी एखाद्या व्रतस्थाप्रमाणे कार्य केले.

त्यांचे मूळ नाव दत्तात्रय अंबादास मायाळू. चित्रपटासाठीचे नाव ‘राजदत्त.’ चित्रपट क्षेत्रातील त्यांचे गुरू राजा परांजपे यांच्या नावातील ’राज’ आणि स्वतःच्या नावातील ’दत्ता’ घेऊन ते ‘राजदत्त’ झाले. अमरावती जिल्ह्यातील धामंगाव इथे त्यांचा जन्म. वर्धा येथे जी. एस. कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये ’बीकॉम’पर्यंत शिक्षण घेतले. शिशु अवस्थेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात. तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवक संघ बंदीच्या काळात दोन महिने, १८ दिवस कैद भोगली. सत्याग्रहात भाग घेऊन लहानपणापासून गणेशोत्सव, मेळा, शाळा व महाविद्यालयाच्या गॅदरिंगमध्ये नाटकात भूमिका साकारल्या. त्यांनी कुसुमाग्रजांचे ’दूरचे दिवे’, आचार्य अत्रे यांचे ’उद्याचा संसार’,’साष्टांग नमस्कार’मधील भूमिका विशेष उल्लेखनीय. विशेषतः ’साष्टांग नमस्कर’मधली कवीची भूमिका छानच जमली होती. बाळ कोल्हटकरांच्या ’वाहतो ही दुर्वांची जुडी’मध्येही त्यांनी काम केले.

सदुभाऊ डांगे नावाचे केरळमधील संघाचे प्रचारक होते, ते नाटिका लिहीत. त्यांच्या सगळ्या नाटिकांमधून राजदत्त यांनी भूमिका केल्या. प्रत्यक्ष राजाभाऊ परांजपे यांच्या हस्ते त्यांना पारितोषिकही मिळाले. महाविद्यालयात असताना दर रविवारी सेवाग्राम जवळच्या गोपुरीतील कृष्ठधाम केंद्रात शुश्रूषा पथकांत सहभागी होत. समाजसेवेची आस आजही त्यांच्या कलाकृतीतून दिसते. लेखक ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या प्रोत्साहनाने दै. ’तरुण भारत नागपूर’ येथील ’युनिव्हर्सिटी’ सदरात लिखाण सुरू केले. त्यांच्यातील पत्रकारितेची ही सुरुवात होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील दै. ‘तरुण भारत’ या वृत्तपत्रात नोकरी केली. त्यानंतर मद्रासच्या ’चांदोबा’ या मुलांच्या मासिकात संपादकीय विभागात दोन वर्षं काम केले.

राजदत्त यांचा चित्रपट दिग्दर्शनीय प्रवास ’मधुचंद्र’ (१९६७) ते ’झंझावात’ (२००१) असा. राजदत्त यांनी दिग्दर्शक म्हणून वाटचाल सुरु केली, तेव्हा मराठीत तमाशापटाचे प्राबल्य होते. ७०च्या दशकात दादा कोंडके यांचा दबदबा होता. डॉ. जब्बार पटेल यांनी वेगळी वाट धरली होती. ८०च्या दशकाच्या उत्तरार्धात विनोदपटाची लाट आली, ती ओसरताच माहेरछाप सोशिक नायिका असलेले चित्रपट आले. या प्रवासात जराही विचलित न होता, राजदत्त यांनी आपली ध्येयपूर्वक वाटचाल कायम ठेवून, आपली वेगळी ओळख निर्माण केली. राजदत्त हे राजा परांजपे यांचे काही वर्ष साहाय्यक दिग्दर्शक होते. यातही एक विशेष गोष्ट आहे, १९५६ साली राजदत्त हे दै. ’तरुण भारत’ या वृत्तपत्रात संपादकीय खात्यात काम करत असतानाच, रात्रपाळी पसंत करत. याचे कारण, दिवसा आपल्याला राजा परांजपे दिग्दर्शित ’पसंत आहे मुलगी’, ’देवघर ’ या चित्रपटाच्या सेटवर जाऊन, राजा परांजपे यांच्या दिग्दर्शनातून काही शिकता येईल का, याचं निरीक्षण करत. त्यातूनच ते काही वर्षांत राजा परांजपे यांचे साहाय्यक दिग्दर्शक बनले आणि ’दत्ता मायाळू’ या नावाने त्यांनी राजा परांजपे दिग्दर्शित ’जगाच्या पाठीवर’, ’गुरुकिल्ली ’ व ’आधार ’ या चित्रपटात भूमिका साकारल्या. विशेष उल्लेखनीय गोष्ट, राजदत्त दिग्दर्शित ’मधुचंद्र’, ’अपराध’, ’वर्‍हाडी आणि वाजंत्री’ व ’या सुखानो या’ या चित्रपटात राजा परांजपे यांनी भूमिका साकारली. ’मधुचंद्र’ या चित्रपटाची कालांतराने दिग्दर्शक मेहुलकुमार यांनी हिंदीत ’लव्ह मॅरेज’ (अनिल कपूर व मीनाक्षी शेषाद्री) असा रिमेक केला. राजदत्त यांनी आपल्या दिग्दर्शनातील वाटचालीत कायमच विविधता ठेवल्याचे दिसते. अनेक विषयांवर त्यांनी चित्रपट दिग्दर्शित करून आपले अनुभवविश्व विस्तारतानाच रसिकांनाही तसाच विविध स्वरुपाच्या जणू विश्वात त्यांनी नेले.

’देवकीनंदन गोपाला’ (१९७७) या चरित्रपटाचे आव्हान त्यांनी उत्तमरितीने सांभाळले. डॉ. श्रीराम लागू यांनी गाडगे महाराजांची भूमिका साकारली. बुद्धिवादाचा पुरस्कार करणारा असा हा चित्रपट आहे. शरद पिळगावकर निर्मित ’अष्टविनायक’ (१९७९)मध्ये कथेच्या ओघात त्यांनी चित्रपट रसिकांना एका गाण्यातून अष्टविनायक यात्रा घडवून आणली. काही तात्कालिक टीकाकारांनी हा चित्रपट राजदत्त यांचे दिग्दर्शनीय सातत्य आणि विषयाची विविधता उल्लेखनीय होती. चित्रपटाच्या नावावरून ते जास्त स्पष्ट होते. ’भालू’( १९८०) नाना पाटेकरने स्वीकारलेला हा पहिला चित्रपट ’अरे संसार संसार’ (१९८१) या चित्रपटाची गोष्ट मेहबूब खान दिग्दर्शित ’मदर इंडिया’वरून बेतली होती. पण, त्याचे ग्रामीण भागातील गोष्टीत चांगलेच सादरीकरण झाले. राजदत्त यांनी याला मराठी चित्रपटाचे व्यक्तिमत्त्व दिले. ’आपलेच दात आपलेच ओढ’, ’शापित’ (१९८२), ’राघु मैना’, ’सासू वरचढ जावई’ (१९८३), ’हेच माझे माहेर’, ’मुंबईचा फौजदार’ (१९८४), ’अर्धांगी’ (१९८५) अजिंक्य देवची भूमिका असलेला हा पहिला चित्रपट. ‘आज झाले मुक्त मी’, ’माझं घर माझा संसार’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित होता. ’पुढचं पाऊल’ (१९८७) हे त्यांचे विशेष उल्लेखनीय चित्रपट. यातील ’शापित ’ या चित्रपटात एका वेठबिगाराच्या (यशवंत दत्त) तडफदार पत्नीचा (मधु कांबिकर) आगळावेगळा लढा होता. राजदत्त दिग्दर्शित ’सर्जा’ हा चित्रपट या सगळ्यांत पुन्हा वेगळाच.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक मावळा सर्जा (अजिंक्य देव) यांच्या निष्ठेची ही गोष्ट. यात सर्जाची प्रेमकथाही रंगते. रमेश देव यांनी या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीवर विशेष लक्ष देऊन, अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत आपला हा चित्रपट पोहोचवण्याचा सकारात्मक प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यशही आले. या चित्रपटासाठीचे मुंबईतील प्लाझा चित्रपटगृहावरचे भव्यदिव्य दिमाखदार डेकोरेशन कौतुकाचा विषय ठरले. पण, राजदत्त त्यातही साधेच राहिले. खांद्यावर झोळी आणि समोरच्याचे म्हणणे पूर्ण झाल्यावर अतिशय शांतपणे आपलं म्हणणं मांडणे, हे त्यांचे वैशिष्ट्य! मीदेखील अनेकदा अनुभवले. काही दिवसांपूर्वीच सतीश रणदिवे दिग्दर्शित ’मार्ग माझा एकला’ या चित्रपटाच्या ट्रायलच्या निमित्ताने राजदत्त यांची भेट झाली असता, तेच वैशिष्ट्य पुन्हा अनुभवले. वयाच्या ९३व्या वर्षीही त्यांनी अशा पद्धतीने एका मराठी चित्रपटाच्या ट्रायलला आवर्जून येणे, यात त्यांची चित्रपट या माध्यम व व्यवसायावरील बांधिलकी दिसते. २०१२ साली सतीश रणदिवे दिग्दर्शित ’दुसर्‍या जगातील’ या अनाथ मुलींच्या भावविश्वाचे दर्शन घडवणार्‍या चित्रपटात महत्त्वाची भूमिकाही साकारली.

राजदत्त यांनी प्रसंगी विलक्षण स्वाभिमानही दाखवला. ८०च्या दशकात पुणे शहरात घडलेल्या जोशी-अभ्यंकर खून खटल्यावर आधारित ’माफीचा साक्षीदार’ ( हिंदीत ’फांसी का फंदा’) या चित्रपटावर भरपूर मेहनत घेतली. विषय वादग्रस्त असल्याने, तो चुकीच्या पद्धतीने पडद्यावर येऊ नये, गैरसमज होऊ नयेत, याकडे त्यांचा कल होता. पण, सेन्सॉरने हा चित्रपट कैचीत पकडला. यातील काही दृश्ये आक्षेपार्ह ठरवली. ट्रीब्युनलला जाणे आणि काही भागांचे रिशूटिंग करणे हा मार्ग होता. आता होणारे बदल मूळ गोष्टीला मारक ठरत होते, यावरून निर्माते हिरालाल शहा यांची भूमिका न पटल्याने, राजदत्त यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन सोडले आणि या चित्रपटाशी कोणताही संबंध ठेवला नाही. त्यांनी दिग्दर्शित केलेला ’झंझावात’ (२००१) हा चित्रपट सतत काही ना काही कारणास्तव निर्मितीवस्थेत रखडला, तरी राजदत्त यांनी त्या चित्रपटावरची आपली दिग्दर्शनीय पकड कायम ठेवली.

राजदत्त यांनी अनेक पुरस्कारांवर आपला विशेष ठसा उमटविला. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ’शापित ’,’पुढचं पाऊल ’ व ’सर्जा’ या चित्रपटांना ’राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ प्राप्त झाले. ’घरची राणी’, ’अपराध’, ’देवकीनंदन गोपाळा’, ’शापित’, ’राघू मैना’, ’हेच माझे माहेर’, ’अर्धांगी’, ’पुढचं पाऊल’ या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शक यांचा राज्य पुरस्कार प्राप्त झाला. राजदत्त यांना चित्रपट व्यवसायातील त्यांच्या योगदानाबद्दल ‘व्ही. शांताराम प्रतिष्ठान’च्यावतीने ’व्ही. शांताराम पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.


अशा वतस्थ्र दिग्दर्शकाला ’पद्मभूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येत आहेा, याबद्दल खूप खूप अभिनंदन!

दिलीप ठाकूर
glam.thakurdilip@gmail.com
Powered By Sangraha 9.0