‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार २०२४’ चा सोहळा रंगणार फेब्रुवारीत

25 Jan 2024 10:39:16

dadasaheb phalke award 
 
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावे दिला जाणारा ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार २०२४’ या सोहळ्याची पत्रकार परिषद २४ जानेवारी २०२४ रोजी मुंबईत संपन्न झाली. यावेळी दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सी.ई.ओ अभिषेक मिश्रा, अभिनेत्री दिया मिर्झा, अदिती राव, नुसरत भरुचा सह मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अभिनेत्री दिया मिर्झा म्हणाली की, “ओटीटी वाहिन्यांमुळे माझ्यासारख्या काही वर्ष हाती काम नसणाऱ्या कलाकारांना उत्तम संहिता मिळाली याचा आनंद आहे”.
 
दरम्यान, ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार २०२४’ हा सोहळा येत्या २० फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार आहे. २०२३ या वर्षातीस कलाकारांना त्यांच्या कामाची पोचपावती हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करत दिली जाणार आहे. २०१२ सालापासून हा मानाचा पुरस्कार पंतप्रधान कार्यालयातून मिळालेल्या आदेशानुसार चित्रपटसृष्टीत महत्वपुर्ण कामगिरी करणाऱ्या कलाकारांनी प्रदान केला जात आहे.
 
“ २००१ मध्ये ‘रहना है तेरे दिल मै’ हा माझा पहिला चित्रपट आला होता आणि त्यानंतर २०२३ मध्ये धकधक हा माझा चित्रपट आला जो वेगळ्या विषयाला अनुसरून होता. माझ्या अभिनय कारकिर्दीतील २३ वर्ष आज माझ्या डोळ्यासमोर आहेत. मला यावेळी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे १५० वर्ष लागली धकधक सारखा चार स्वतंत्र विचारांच्या, वयोगटातील महिलांवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी. या चित्रपटाने सर्व क्षेत्रातील महिलांना सक्षम आणि आपले स्वातंत्र्य अनुभवण्यास शिकवले", असे दिया म्हणाली.
 
तसेच, २३ वर्ष मागे जात या क्षेत्रात माझी सुरुवात आजूबाजूला असणाऱ्या अनेक पुरुष सह कलाकारांसमवेत झाली. परंतु, जसा काळ बदलला तशी महिला कलाकारांची संख्या अधिक वाढत गेली आणि वेगवेगळ्या विषयांच्या कलाकृतींमध्ये विविध वयोगटातील महिला कलाकार उत्कृष्ट भूमिका साकारत आहेत याचा आनंद आणि अभिमान आहे, असे मनोगत देखील दियाने व्यक्त केले. तसेच, वाढत्या ओटीटी वाहिन्यांमुळे विविध वयोगटातील माझ्या सारख्या कलाकारांना वेगळ्या भूमिका आणि आपला अभिनय आणखी ताकदीने सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले असे देखील दिया म्हणाली.
Powered By Sangraha 9.0