ज्ञानवापीचे सत्य बाहेर येणार? न्यायालयाचा मोठा निर्णय!

25 Jan 2024 15:07:39
 GYANVAPI
 
लखनौ : ज्ञानवापी प्रकरणात वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने दि. २४ जानेवारी २०२४ ला महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. आपल्या निर्णयामध्ये न्यायालयाने 'भारतीय पुरातत्व सर्वेक्षण' (एएसआय) ने ज्ञानवापी परिसरात केलेले पुरातत्वीय सर्वेक्षणाचा अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे हिंदू आणि मुस्लीम दोन्ही बाजूच्या लोकांना हा अहवाल पाहता येणार आहे.
 
न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना, ज्ञानवापी प्रकरणातील हिंदू पक्षाचेचे प्रतिनिधित्व करणारे वकील हरी शंकर जैन म्हणाले, “एएसआय अहवाल सार्वजनिक करू नये यावर बरेच आक्षेप घेण्यात आले. आज न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत दोन्ही पक्षांना अहवाल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. अहवाल सार्वजनिक केला जाईल आणि अहवालात काय आहे ते सर्वांना कळेल.”
 
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, २१ जुलै रोजी वाराणसी जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशानुसार एएसआयने वाराणसीतील ज्ञानवापी संकुलाचे वैज्ञानिक सर्वेक्षण केले होते. ही मशीद हिंदू मंदिराच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या रचनेवर बांधली गेली होती की नाही हे शोधण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. यानंतर, ४ ऑगस्ट २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एएसआयला 'वजुखाना' क्षेत्र वगळता वाराणसीतील ज्ञानवापी संरचनाचे सर्वेक्षण करण्यापासून रोखण्यास नकार दिला होता. या 'वजुखाना' परिसरात गेल्या वर्षी 'शिवलिंग' सापडले होते.
 
एएसआयने १८ डिसेंबर २०२३ रोजी ज्ञानवापी सर्वेक्षणाचा अहवाल सीलबंद लिफाफ्यात न्यायालयात सादर केला होता. यानंतर हिंदू पक्षाने हा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र, हा अहवाल सार्वजनिक न करण्यासाठी मुस्लिम पक्षाने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण, आता न्यायालयाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0