ज्ञानवापीमध्ये मशिदीपूर्वी भव्य मंदिर अस्तित्वात होते;एएसआय सर्वेक्षणामध्ये खुलासा!

25 Jan 2024 22:26:29
Gyanvapi mosque
नवी दिल्ली : ज्ञानवापीमध्ये मशिदीच्या सध्याच्या बांधकामापूर्वी भव्य हिंदू मंदिर होते, असा निष्कर्ष भारतीय पुरातत्व विभागाच्या (एएसआय) सर्वेक्षणामध्ये आल्याचे हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी गुरूवारी रात्री वाराणसी येथे पत्रकारपरिषदेत सांगितले.

न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानवापी संकुलाचे एएसआयतर्फे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणाचा अहवाल हा सार्वजनिक करून दोन्ही पक्षांना देण्यात यावा, अशी याचिका हिंदू पक्षाने दाखल केली होती. वाराणसी न्यायालयाने हिंदू पक्षाचा दावा मान्य केला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री उशीरा हिंदू पक्षास ८३९ पानी अहवालाची प्रत प्राप्त झाली.

Gyanvapi


हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी हिंदू पक्षकारासह रात्रीच पत्रकारपरिषद घेऊन अहवालाच्या निष्कर्षाची माहिती दिली. ते म्हणाले, एएसआय सर्वेक्षणाच्या निष्कर्षामध्ये म्हटले आहे की, वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे असे म्हणता येते की सध्या असलेल्या ढाच्याच्या बांधकामापूर्वी येथे अतिशय भव्य असे हिंदू मंदिर होते. याचाच अर्थ येथे असलेल्या मशिदीचे बांधकाम होण्यापूर्वी येथे अतिशय मोठे असे हिंदू मंदिर होते, असे विष्णू शंकर जैन यांनी म्हटले.

अहवालामध्ये हिंदू मंदिर असल्याचे अनेक पुरावे मिळाले असल्याचे जैन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, तथाकथित मशिदीची पश्चिमेकडील भिंत ही अगोदरच अस्तित्वात असलेल्या हिंदू मंदिराचा भाग आहे. ही भिंत हिंदू पद्धतीच्या चिन्हांनी सुशोभित करण्यात आल्याचे दिसले आहे. सध्याच्या ढाचाच्या तळघरात हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती आहेत, ज्या मातीत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असेही अहवालामध्ये नमूद करण्यात आल्याची माहिती विष्णू शंकर जैन यांनी दिली आहे.

काय सांगतो अहवाल ?

· एएसआयने 839 पानांचा अहवाल तयार केला आहे, ज्यात मशिदीपूर्वी तेथे हिंदू मंदिर होते असे नमूद केले आहे.

· सर्वेक्षणात अशा 32 ठिकाणी पुरावे सापडले आहेत, ज्यावरून असे दिसून येते की तेथे पूर्वी हिंदू मंदिर होते.
 
· एएसआयने 2 सप्टेंबर 1669 रोजी मंदिर पाडल्याच्या जदुनाथ सरकारच्या निष्कर्षावर विश्वास व्यक्त केला आहे.

· देवनागरी, ग्रंथ, तेलगू आणि कन्नड भाषेत लिहिलेले शिलालेख सापडले आहेत.

· जनार्दन, रुद्र आणि विश्वेश्वराचे शिलालेख सापडले आहेत.

· एका ठिकाणी महामुक्ती मंडप असे लिहिलेले आहे, जे एएसआयच्या मते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.

· मंदिर पाडल्यानंतर त्याचे खांब मशीद बांधण्यासाठी वापरण्यात आले.

· तळघरात हिंदू देवदेवतांच्या मूर्ती होत्या.

· ज्ञानवापीची पश्चिमेकडील भिंत हिंदू मंदिराचा भाग म्हणून सहज ओळखता येते.


 
Powered By Sangraha 9.0