मुंबई : भारतातील दोन प्रमुख मनोरंजन कंपनी असलेल्या झी आणि सोनीच्या विलीनीकरण रद्द झाले आहे. या दोन्ही कंपन्यांनी डिसेंबर २०२१ मध्ये विलीनीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी करार केला होता. पण आता विलीनीकरण समाप्त करण्यासाठी, सोनीने दि. २२ जानेवारी रोजी 'झी'ला करार रद्द करण्याचे पत्र पाठवले आहे. झी वर अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचा आरोप करत सोनीने ७४८ कोटींच्या टर्मिनेशन फीचीही मागणी केली आहे.
सोनीच्या पत्राद्वारे लावण्यात आलेल्या आरोपांवर 'झी'ची प्रतिक्रिया आली आहे. 'झी'ने सोनीचे दावे फेटाळून लावत सोनीवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. दोन्ही कंपन्यांना भारतीय मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. सोनी भारतात आपला व्यवसाय फारसा वाढवू शकली नाही, तर झी कर्जाच्या ओझ्याखाली दबली होती.
या कारणांमुळे या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. या विलीनीकरणामुळे दोन्ही कंपन्यांना मोठा आणि वैविध्यपूर्ण प्रेक्षकवर्ग मिळाला असता. दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण यशस्वी झाले असते. तर, भारतीय बाजारपेठेत २४ टक्के हिस्सेदारीसह सर्वात मोठे मनोरंजन नेटवर्क बनले असते.