मुंबई : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत आज दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत केली जाणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी संपुर्ण अयोध्यानगरी विविध मान्यवरांच्या उपस्थितीने बहरुन आली आहे. राम मंदिराच्या आवारात रामाची गाणी ऐकू येत आहेत. यात राम आएंगे हे गाणे विशेष असून चक्क दिवंगत गाणसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आहे. लता दीदींच्या आवाजातील हे गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांची अनुपस्थिती या गाण्यामुळे काहीशी दुर झालेली अनुभवायला मिळत आहे.
गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन होऊन आता २ वर्षे उलटली असली तरीही त्यांच्या आवाजाची जादू मात्र कायम आहे. त्यांच्या आवाजात प्रभू रामाचे गाणे नसणे हि कल्पनाच करणे फार अशक्य असल्यामुळे AI द्वारे 'राम आएंगे' हे गाणे त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करुन लता दीदींना आदरांजली वाहिली आहे.
सध्या सोशल मीडियावर लतादीदींच्या आवाजातील 'राम आएंगे' हे गाणं तुफान व्हायरल होत आहे. एका AI वापरकर्त्याने हा व्हिडीओ युट्यूबवर प्रदर्शित केला आहे. दरम्यान, कोणत्याही आर्थिक लाभासाठी हा ऑडिओ तयार केला नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे संबंधित गायक, संगीतकार यांचा आदर ठेवून ही कृती तयार करण्यात आली आहे.