तैवानमुळे चीनची ‘लाई लाई’

21 Jan 2024 22:54:12
 LIE
 
एकीकडे इराण-पाकिस्तान झुंजत असताना, दुसरीकडे चीन दोन्ही राष्ट्रांना शांत राहण्याचे डोस देतोय. मात्र, तैवानमधून लाई चिंग यांच्या नेतृत्वातील सरकार निवडून आल्याने चीनची ‘लाई लाई’ झालेली दिसते. लाई हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे कट्टर विरोधक.
 
नुकताच लाई यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला असून, तैवानचे नवे राष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथग्रहणही केली. याआधी लाई हे तैवानचे उपराष्ट्रपती होते. सत्ताधारी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (डीपीपी)चे लाई चिंग-ते ज्यांना ‘विल्यम लाई’ म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी 41.6 टक्के टक्के मते मिळवत विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी कुओमिंतांग (केएमटी)च्या होऊ यू-इह यांना 33.4 टक्के मते मिळाली.
 
लाई चिंग-ते यांच्याकडे चीन कट्टर विरोधक म्हणून पाहतो. तेच आता राष्ट्रपती झाल्यामुळे चीनला हा मोठा झटका मानला जात असून, चीनची चांगलीच गोची झाली आहे. तैवानची सूत्रे आता लाई यांच्या हाती आल्यामुळे, चीन-तैवान संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.
 
लाई यांनी निवडणूक प्रचारादरम्यान उदारमतवादी भूमिका घेत, मतदारांना साद घातली. तैवानच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि चीनसोबत एकत्र येण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना नेहमीच विरोध राहील. तैवानला अधिक लोकशाही आणि समृद्ध समाज बनविण्यासाठी काम करणार असल्याचे आश्वासन लाई यांनी तैवानवासीयांना दिले. शी जिनपिंग तैवानला चीनचा प्रांत मानतात. तैवानवर ताबा मिळवण्यासाठी, अनेकदा चीनने तैवानला लष्करी कारवाई करण्याच्या धमक्यासुद्धा दिल्या आहेतच.
 
मात्र, तैवानने कधीही चीनच्या धमक्यांना भीक घातली नाही. लाई सत्तेत आल्याने, तैवानमध्ये चीनविरोधी भावना आणखी वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच लाई यांनी तैवानच्या लोकांना चीनसोबत संघर्ष करण्यासाठी आधीच तयार राहण्याचे सूचित केले आहे.
 
विशेष म्हणजे, लाई यांच्या विजयाने चीनला मोठा धक्का बसला असला, तरी अमेरिकेला मात्र आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. अमेरिकेचे चीनशी वाकडे असल्याने, ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या उक्तीप्रमाणे लाई यांच्या विजयाचे अमेरिकेने मात्र जोरदार स्वागत केले आहे.
 
अमेरिका अधिकृतपणे तैवानला स्वतंत्र देश मानत नसला, तरी ते तैवानच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगत, तैवानला आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करू शकतात. याच कारणामुळे चीन कोंडीत सापडला आहे. तिकडे इराण-पाकिस्तान संघर्ष सुरू असताना, त्यांना शांत करत असताना, चीन-तैवान संघर्षही उफाळून येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
 
चिनी विस्तारवारवादी कम्युनिस्ट सत्तेला लाई यांचा विजय पचेनासा झाला आहे. वारंवार युद्धाच्या धमक्या देणं, तैवानच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी करणे, तैवानवर कब्जा करण्याचा इशारा देणं अशा बर्‍याच गोष्टी तैवान याआधीही झेलत आला आहे. मात्र, तैवानमधील सत्तेने कधीही चिनी हुकूमशाहीसमोर आपल्या माना झुकवल्या नाही.
 
धमक्यांना घाबरून शरणागती पत्करली नाही. भले छोटा देश असला, तरीही तैवाने कायम आपल्या स्वतंत्रतेचे आणि सार्वभौमत्वाचे समर्थन केले. यापूर्वी त्याई इंग वेन राष्ट्रपती असताना, त्यांनी चीनच्या धमक्यांना भीक न घालता, तैवानचे सार्वभौमत्व कायम ठेवले आणि आता नव्याने निवडून आलेले लाई हेदेखील त्याच मार्गावर चालले आहे.
 
दरम्यान, लाई चिंग-ते यांच्या डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीने तैवान हा चीनचा भाग आहे, या गोष्टीचा कधीही स्वीकार केला नाही. पक्षाच्या याच भूमिकेमुळे त्यांना तिसर्‍यांदा सत्ता मिळाली आहे. निवडणुकीपूर्वी चीनने तैवानमधील मतदारांना लाई यांना निवडून देऊ नका, अन्यथा चीनचा रोष सहन करावा लागेल, अशी धमकी दिली होती.
 
मात्र, तैवानचे सुज्ञ मतदार चीनच्या कोणत्याही धमक्यांना बळी पडले नाही व लाई यांचा विजय निश्चित झाला. लाई राष्ट्रपती झाल्यानंतर चीन त्यांना सहजासहजी सत्ता चालवू देईल, असे वाटत नाही. त्यांना चीनच्या कुरबुरींचाही सामना करावा लागू शकतो. मात्र, एकजुटीने बलाढ्य चीनलाही नमवता येते, हे तैवानच्या जनतेने दाखवून दिले. चीनला शरण जाण्यापेक्षा त्यांनी आपल्या एकजुटीने देशाचे स्वातंत्र्य आजही अबाधित ठेवले आहे, हेही नसे थोडके...
 
७०५८५८९७६७
Powered By Sangraha 9.0