मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणातील प्रमूख आरोपीला अखेर दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डीपफेक प्रकरणी दिल्ली पोलिसांनी १० नोव्हेंबर २०२३ रोजी एफआयआर नोंदवला होता. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीचा यापूर्वीही अनेक प्रकारच्या सायबर गुन्ह्यात सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. याच आरोपीने रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ तयार केल्याची माहिती समोर येत आहे.
आय.एफ.एस.ओ युनिटचे डीसीपी हेमंत तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक प्रोफाइल प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी या आरोपीला दक्षिण भारतातून अटक केली. सध्या आरोपीची चौकशी सुरू असल्याचेही पोलिसांकडून सांगितले जात आहे. १० नोव्हेंबर रोजी आयपीसी कलम ४६५ आणि ४५९ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६सी आणि ६६ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन (IFSO) युनिटमध्ये या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ए.एनआय च्या वृत्तानुसार, दोन महिन्यांच्या तपास आणि डिजिटल फूटप्रिंट्सच्या माध्यमातून पोलीस मुख्य आरोपीपर्यंत पोहोचले. त्यासाठी पोलिसांच्या स्पेशल सेलने आयपी अॅड्रेसच्या माध्यमातून हा व्हिडीओ सर्वप्रथम कुठे तयार करण्यात आला आणि कुठून अपलोड करण्यात आला याचा शोध घेतला आणि त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले.