ऑस्कर विजेते एमएम कीरावनी यांनी सादर केलं बाबूजींचं लोकप्रिय गाणं

20 Jan 2024 12:31:10

sudhir phakde 
 
मुंबई : मनोरंजनसृष्टीत मानाचा पुरस्कार असणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदाही एका भारतीय कलाकाराचा सन्मान झाला. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एमएम कीरावनी यांना एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ या गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आणि सर्व भारतीयांचे डोळे आनंदाश्रुंनी पाणावले. यानंतर झालेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही एमएम कीरावनी यांनी हजेरी लावली आणि आपले मनोगत व्यक्त केले.
 
पुण्यात संपन्न झालेल्या या चित्रपट महोत्सवात चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल देखील तिथे उपस्थित होते. यावेळी यंदा ऑस्कर विजेत्या एमएम कीरावनी यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांना ऑस्कर स्वीकारताना त्यांच्या नेमक्या काय भावना होत्या असे विचारले असता एमएम कीरावनी यांनी ज्येष्ठ संगीतकार व गायक सुधीर फडके यांचे एक लोकप्रिय मराठी गाणंदेखील सगळ्यांसमोर सादर करत जमलेल्या रसिक प्रेक्षकांना अवाक केले.
 
एमएम कीरावनी यांनी सुधीर फडके यांनी गायलेले व संगीतबद्ध केलेले ‘तोच चंद्रमा नभात’ हे गाणे गायले. एमएम कीरावनी यांना बाबूजी यांचं गाणं सादर करताना पाहून तिथे उपस्थित असलेले प्रेक्षक तसेच डॉ.जब्बार पटेलदेखील भावुक झाले. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Powered By Sangraha 9.0