विकसित भारत संकल्प यात्रेला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

02 Jan 2024 20:20:40
viksit bharat yatra news

मुंबई :
केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ व्हावा यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला मुंबई महानगरात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दि. १५ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झालेली ही यात्रा आतापर्यंत लक्षावधी नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. यात हजारोंच्या संख्येने लाभार्थ्यांना फायदा मिळाला आहे. दि. २६ जानेवारी २०२४ या कालावधीपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. आपल्या परिसरात येणाऱ्या या यात्रेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा अनेकांना फायदा होतो. विविध शासकीय कार्यालयांमध्ये या योजनांची दालने असून, तेथूनही नागरिकांना लाभ मिळतो आहे. केंद्र शासनाने सुरू केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे घरापर्यंत यंत्रणा पोहोचत असल्याने हजारो अतिरिक्त नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळाला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबालसिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे संपर्ण मुंबई महानगरात आयोजन करण्यात आले आहे. बृहन्मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये विशेष अशा चार वाहनांद्वारे केंद्र शासन पुरस्कृत योजनांची नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा विचार करता मुंबई शहर जिल्ह्यात ५४, तर मुंबई उपनगरे जिल्ह्यात १६६ ठिकाणी अशा एकूण २२० ठिकाणी या यात्रेची माहिती देणारे रथ पोहोचले आहेत.

ज्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला आहे, असे लाभार्थी यात्रेतून ‘मेरी कहानी मेरी जुबानी’द्वारे स्वअनुभव कथन करीत आहेत. ही यात्रा मुंबई महानगराच्या ज्या भागात पोहोचते, तेथे ‘खेलो इंडिया’ हे क्रीडा क्षेत्राशी निगडित असलेले दालन असते. या दालनालाही नागरिकांनी भेटी दिल्या आहेत. विविध योजनांची माहिती घेतली. याप्रमाणे सौभाग्य योजना, मुद्रा कर्ज योजना आणि स्टार्ट अप इंडिया योजनेचा लाभ नागरिकांना मिळाला आहे.
 
‘मेरी कहानी मेरी जुबानी’द्वारे अनेक लाभार्थी अनुभव कथन करीत आहेत. त्यातून महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागात दि. १६ डिसेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांदिवली-चारकोप येथील लाभार्थी मेघना गुरव यांच्याशी थेट संवाद साधला. श्रीमती गुरव यांना मुद्रा, पीएम स्वनिधी, स्वनिधी ते समृद्धी या योजनांचा लाभ मिळाला आहे.

- यात्रेची उद्दिष्ट्ट्ये

महानगरपालिका क्षेत्रातील विविध योजनांसाठी पात्र असलेल्या परंतु लाभापासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविणे, त्याबाबत जागृती करणे, शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, निश्चित केलेल्या पात्रतेनुसार संभाव्य लाभार्थी यांची यात्रेमध्ये नोंदणी करणे आदी या यात्रेची उद्दिष्टे आहेत. या यात्रेदरम्यान विविध योजनांचे लाभार्थी या वाहनांना भेट देऊन थेट लाभ घेत आहेत.

- या योजनांचा मिळतोय थेट लाभॉ

उज्ज्वला, पीएम स्वनिधी, खेलो इंडिया, स्वनिधी ते समृद्धी, आयुष्मान भारत, स्टार्टअप इंडिया, प्रधानमंत्री आवास, सौभाग्य, विश्वकर्मा आदी १७ प्रकारच्या योजनांचा या यात्रेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे. या महत्वाकांक्षी योजना समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी, योजनांबाबतची जनजागृती करून योजनेची परिपूर्णता साध्य करण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’उपयुक्त ठरत असल्याचे महानगरपालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी सांगितले.
 
- २ हजार ७३१ लाभार्थ्यांना स्वनिधी योजनेचा, तर ५०८४ लाथार्थ्यांना संकल्प योजनेचा लाभ

-आरोग्य तपासणी दालनांद्वारे आतापर्यंत २९ हजार ४४२ नागरिकांची तपासणी

-१५ हजार ३८३ गरजू नागरिकांना उज्ज्वला योजनेचा लाभ

- १६ हजार नागरिकांना आयुष्मान कार्ड वितरित

- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांमध्ये फिरताहेत चार विशेष वाहने

- २६ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू राहणार यात्रा



Powered By Sangraha 9.0