बंगलोर : अयोध्येत दि. २२ जानेवारी २०२४ रोजी श्री राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्याआधी कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या पोलिसांनी ३० वर्षांपूर्वी राम मंदिर आंदोलनात सहभागी झालेल्या कारसेवकांच्या विरोधात तपास सुरू केला आहे. तीन दशकांपूर्वी झालेल्या या आंदोलनाशी संबंधित १९९२ च्या प्रकरणात पोलिसांनी कारसेवक श्रीकांत पुजारींना अटक केली आहे.
त्यामुळे राममंदिर आंदोलनात सहभागी असलेल्या अन्य कारसेवकांवर अटकेची टांगती तलवार आहे. आयएएनएसच्या वृत्तानुसार, पोलिस विभागाने एक विशेष टीम तयार केली आहे. या टीमने १९९२ च्या राम मंदिर आंदोलनाशी संबंधित प्रकरणातील 'संशयितांची' यादी तयार केली आहे. या आंदोलनात कट्टरपंथीयांच्या हिंसाचारामुळे संघर्ष झाला होता. यावेळी ५ डिसेंबर १९९२ रोजी हुबळी येथे मलिक नावाच्या व्यक्तीच्या दुकानाला आग लागली होती. या कथित जाळपोळीप्रकरणी श्रीकांत पुजारी यांना हुबळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुजारी हे या प्रकरणातील तिसरे आरोपी आहेत. याप्रकरणी अन्य ८ आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच हुबळी पोलिसांनी ३०० संशयितांची यादी तयार केली आहे. या लोकांचा १९९२ ते १९९६ दरम्यान झालेल्या संघर्षाशी संबंध असल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांच्या या कारवाईवर हिंदू संघटनांनी काँग्रेस सरकारच्या कृतीचा तीव्र निषेध केला आहे.