जपानमध्ये अडकला होता ज्युनिअर एनटीआर, भारतात सुखरुप परतल्यावर म्हणाला, “भूकंपाच्या धक्क्यांमुळे मला…”

02 Jan 2024 11:20:12
 
junior ntr
 
मुंबई : जपानमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारी २०२४ रोजी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाच्या या धक्क्यामुळे प्रचंड नुकसान झाले असून तेथील हवामान विभागाने त्सुनामीचा इशारा देखील दिला आहे. दरम्यान, भुकंपाच्या या झटक्यांनंतर रस्ते व घरांची दशा खराब झाली असून हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन जपान सरकारने केले आहे. दुर्दैवाने या भूकंपाच्या धक्क्यात अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. महत्वाची बाब म्हणजे जपानमध्ये झालेल्या या भूकंपाच्या घटनेत दाक्षिणात्य अभिनेता ज्यनिअर एनटीआर जपानमध्ये अडकला होता. मात्र, आता तो सुखरुप मायदेशी परतला आहे.
 
जपानमध्ये झालेल्या भूकंपावेळी दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर तिथे अडकला होता. परंतु, भारतात तो नुकताच परतला असून त्याने सोशल मिडियावर पोस्ट देखील केली आहे. “जपानहून आज घरी परतलो आणि तिथे आलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे मला धक्का बसला आहे. गेला संपूर्ण आठवडा मी तिथे घालवला आणि या भूकंपामुळे प्रभावित झालेल्या प्रत्येकासाठी मला वाईट वाटतंय. सर्वकाही लवकरच ठिक होईल. मजबूत राहा, जपान,” असे ज्युनिअर एनटीआरने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
 
 
 
दरम्यान, जपानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इशिकावा आणि परिसरात असलेल्या किनारपट्टीच्या भागात अनेक भूकंपाचे धक्के बसले. त्यापैकी एकाची तीव्रता ७.६ ‘रिश्टर स्केल’ इतकी असल्याकारणाने समुद्रात ३ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळू शकतात आणि इशिकावा, निगाता आणि तोयामा या भागात त्सुनामी येण्याची दाट शक्यता देखील वर्तवण्याच आली.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0