मुंबई : उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सुरज चव्हाण यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवार, १७ जानेवारी रोजी अटक केली. कोरोनाकाळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी ही अटक झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ईडीचे अधिकारी गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करणार आहेत.
ईडीने २१ जून २०२३ रोजी खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यात सूरज चव्हाण यांच्या निवासस्थानासह काही अधिकाऱ्यांच्या मालमत्तांचा समावेश होता. या छाप्यांमध्ये जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये अनियमितता आणि मध्यस्थांच्या व्हॉट्सअॅप संदेशांमध्येही महापालिका अधिकाऱ्यांना पैसे दिल्याबाबतचे संभाषण आढळले होते. शिवाय जप्त करण्यात आलेल्या एका डायरीत महापालिका अधिकाऱ्यांना दिलेल्या पैशांच्या नोंदी आढळल्या, असा दावा ईडीने छाप्यानंतर केला होता.
कोरोनाकाळात मुंबई महानगरपालिकेची कंत्राटे चार ते पाच मध्यस्थांच्या माध्यमातून देण्यात आली. यात चव्हाण यांचा सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांना ईडीने समन्स बजावले होते. चव्हाण यांनी अनेक कंत्राटदारांना चढ्या दराने कंत्राटे मिळवून दिल्याचा आरोप आहे. बुधवारी याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आले असून, ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे अतिशय जवळचे सहकारी मानले जातात. ठाकरे गटाच्या महापत्रकार परिषदेलादेखील ते उपस्थित होते.