मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात मंगळवारी उद्धव ठाकरेंनी महापत्रकार परिषद घेतली होती. यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी टीका केली आहे. आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
आशिष शेलारांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "दुर्योधन आणि शकुनी मामाच्या धोका आणि "महा" कपटामुळेच "महा"भारताचे युध्द झाले. म्हणूनच पांडवांच्या हातून सर्व कौरवांचा "महा"नाश झाला. नेहमी एक खोटं लपवण्यासाठी "महा" खोटे बोलावे लागते.
पुढे ते म्हणाले की, "जर मुख्यमंत्रीपदासाठी "महा"कपट, "महा"धोका केला नसता, अडीच वर्षे असं काहीही ठरलं नसतानाही "महा"खोटं बोलला नसता आणि रोज सकाळी खोटं बोलणाऱ्या "महा" शकुनीला आवरले असते तर अशी "महा" पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती," असे ते म्हणाले. तसेच 'जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर,' असा खोचक टोलाही शेलारांनी ठाकरेंना लगावला.