शिवछत्रपतींचे स्वराज्य हीच ‘आत्मनिर्भर भारता’ची प्रेरणा

16 Jan 2024 20:29:14
 

shivaji mharaj 
 
देशाची राजधानी दिल्ली येथे आज, बुधवार, दि. १७ जानेवारी रोजी हिंदवी स्वराज्य स्थापना महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने हिंदवी स्वराज्य स्थापना महोत्सव आयोजन समितीचे संयोजक वैभव डांगे यांचा हा विशेष लेख...
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. दि. ६ जून, १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर झालेल्या राज्याभिषेकाने भारताच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि स्वातंत्र्य चळवळीचा पाया रचला गेला होता. हिंदवी स्वराज्याचा पाया १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी घातला होता. राज्याभिषेकानंतर शिवराय ‘छत्रपती’ झाले आणि हिंदू समाजाला नवा आत्मविश्वास मिळाला. हिंदवी स्वराज्य तोच वारसा आज जागतिक पटलावर भारताची प्रतिमा उंचावत आहे.
 
दि. १९ फेब्रुवारी, १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज हे इतर राजांपेक्षा वेगळे होते. छत्रपती हे बुद्धिमान, पराक्रमी, दूरदर्शी आणि तत्वज्ञानी राजा होते. मुघल राज्यकर्त्यांकडून हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचारांनी शिवाजी महाराजांचे बालपण दुखावले होते. तेथेच हिंदवी स्वराज्य अंकुरले, जे पुढे वटवृक्षासम हिंदवी साम्राज्य झाले. हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदूंचे स्वतःचे राज्य. देशात प्रथमच जाती-धर्माचा विचार न करता मानवी समाज अन्यायाविरूद्ध एकवटला. हिंदवी स्वराज्य हे खर्‍या अर्थाने जनतेने निर्माण केलेले राज्य होते.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीतही ज्या प्रकारे आपले ध्येय साध्य केले, त्यापासून आपल्याला दृढनिश्चयाने आणि एकजुटीने काम करण्याची प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजोमय जीवन आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. आपण नेहमी मोठा विचार केला पाहिजे, हेदेखील आपण त्यांच्याकडून शिकतो. मोठा विचार केल्याने प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याची जिद्द निर्माण होते. त्यामुळेच वयाच्या १६व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून हिंदू समाजाच्या मनात हिंदवी स्वराज्याचा विश्वास रुजवू ते शकले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलांकडून ताब्यात घेतला, तेव्हा त्यांना पुरेसा अनुभव नव्हता. तसेच पुरेसे लष्करी सामर्थ्यही त्यांच्यापाशी नव्हते आणि आर्थिक स्रोत नव्हते. मात्र, त्याच्याकडे समाजाची अशी ताकद होती, ज्याद्वारे त्यांनी दुर्दम्य अशा सह्याद्रीच्या पोटातून नवी वाट निर्माण केली. हिंदवी स्वराज्याचा संकल्प प्रत्येक परिस्थितीत पूर्ण करण्याचे ध्येय त्यांनी साध्य केले. कारण, त्यांची इच्छाशक्ती प्रबळ होती. आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य कामेही शक्य होतात, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकतो.
 
छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल संघटक होते. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी मुघलांविरूद्ध लढण्यासाठी अशा लोकांची फौज तयार केली, ज्यांना राज्यविस्तारापेक्षा स्वराज्याचा ध्यास होता. त्याच्या सैन्यातील प्रत्येक सैनिक कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात तज्ज्ञ होता. शिवाजी महाराज त्यांच्या योग्यतेनुसार व कुवतीनुसार जबाबदारी देत असत. त्यांच्यासोबत हंबीरराव मोहित्यांसारखा सेनापती होता, बहिर्जी नाईक, कान्होजीसारखा गुप्तहेर होता. छत्रपती शिवाजी महाराजांची संघटन शैली तर आजही तितकीच समर्पक आहे. आजच्या काळाप्रमाणे, योग्य कामासाठी योग्य व्यक्ती आणि योग्य व्यक्तीसाठी योग्य काम हे खूप महत्त्वाचे आहे.
‘छत्रपती’ झाल्यानंतरही शिवाजी महाराजांनी आपल्या कष्टात कसूर केली नाही. हा तो काळ होता जेव्हा केवळ मुघलच नव्हे, तर युरोपीय वसाहतवादी, ब्रिटिश, डच, फ्रेंच हेही विस्ताराच्या धोरणाने भारत काबीज करण्याचा प्रयत्न करत होते. मुघल शासकांमध्ये गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि औरंगजेबाचे सैन्य हिंदूंवर आक्रमण करून आपले राज्य वाढवण्याच्या इच्छेने लढत होते. या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी युद्ध आणि आवश्यक तेथे मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारून हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला.
 
केवळ युद्ध करून हिंदवी स्वराज्य स्थापन होऊ शकत नाही, हे छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होते. त्यांच्या कार्यपद्धतीत शिस्त आणि संयम यांना मोठे महत्त्व होते. हिंदवी स्वराज्य बळकट करण्यासाठी हे कार्यवर्तन उपयुक्त ठरले. शिवाजी महाराजांची शिस्त एवढी कडक होती की, न्याय देताना त्यांनी नात्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. संभाजी मोहिते, सखोजी गायकवाड यांसारख्या नातेवाईकांनाही त्यांनी शिक्षा सुनावण्यात भेदभाव केला नाही. नेताजी पालकरांना सेनापती पदावरून हटवण्याबरोबरच त्यांचा मुलगा शंभूराजांना त्यांच्या चुकीची शिक्षा देण्यातही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. ते म्हणायचे की, “स्वराज्य तेव्हाच टिकेल, जेव्हा कोणत्याही आपुलकीची किंवा परकेपणाची भावना न ठेवता राज्यकारभार चालेल.” हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी प्रशासकीय व्यवस्थापनाबरोबरच सामाजिक समरसता, न्यायव्यवस्था, कृषी व व्यापार धोरण, धार्मिक सलोखा, कठोर करप्रणालीचे सुलभीकरण, स्थानिक भाषा यांना महत्त्व दिले आणि शत्रूंशी लढण्यासाठी आपल्या सैन्याचे आधुनिकीकरण केले. मोठ्या ध्येयासाठी कठोर शिस्त आवश्यक असते, अशी शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. त्यांनी स्वतःसाठी कधीही तडजोड केली नाही. हिंदवी स्वराज्याच्या ध्येयापासून विचलित होईल, असे कोणतेही पाऊल त्यांनी उचलले नाही.
 
छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल राजकारणी तसेच शूर योद्धा होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अभ्यास केला, तर लक्षात येते की, त्यांनी नेहमीच दूरगामी विचार केला. मुघल सम्राट औरंगजेबाला भेटायला आग्र्याला जाणे असो, शाहिस्तेखानावर लाल महालात हल्ला करणे असो किंवा प्रतापगडावर अफजलखानाचा वध करणे असो; त्यांचा हा प्रत्येक पराक्रम दूरदृष्टीचे द्योतक ठरतो. शिवाजी महाराजांची कार्यशैली आपल्याला प्रेरणा देते की शहाणपणाने उचललेले कोणतेही जोखमीचे पाऊल नेहमीच यशाकडे घेऊन जाते.
 
छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यपद्धती सर्वांपेक्षा वेगळी होती. हिंदवी स्वराज्यासाठी ज्या सुधारणा आणि बदल आवश्यक होते, त्यात त्यांनी काळानुरूप बदल केले. ते वाईट प्रथांच्या विरोधात होते, म्हणूनच त्यांचे वडील शहाजीराजांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी त्यांची आई जिजाबाई यांना सती जाण्यापासून रोखले. शिवाजी महाराजांनी काळाची गरज समजून मराठ्यांचे आरमार अर्थात नौदल उभारले. काळानुरूप जे जे आवश्यक ते ते करण्याचा त्यांचा स्वभाव होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांना योग्य सन्मान दिला जात होता. घरगुती कामाव्यतिरिक्त महिलांना प्रथमच युद्धाचे प्रशिक्षणही देण्यात आले. तत्कालीन परंपरेत जिंकलेला पैसा आणि स्त्रिया राजाकडे सुपुर्द केल्या जात होत्या. परंतु, शिवरायांनी ही परंपरा बदलून महिलांना सन्मान देऊन एक चांगला व चारित्र्यवान राजा असल्याचा आदर्श घालून दिला.
 
हे आपले स्वराज्य आहे, हे जनतेला कळावे हा शिवाजी महाराजांचा उद्देश होता, यासाठी त्यांनी प्रशासकीय व्यवस्थेसाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. अश्वदल, पायदळ आणि आरमारासोबतच सैन्याचा शस्त्रसाठा वाढवला. त्यांनी शिस्तबद्ध प्रशासकीय व्यवस्थेसह कार्यक्षम आणि प्रगतीशील नागरी समाजाचा पाया घातला. मुघलांनी पाडलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायप्रक्रिया यांचे पुनरुज्जीवन केले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याला ‘हिंदवी स्वराज्य’ असे नाव दिले. आजच्या राजकीय पार्श्वभूमीवर महाराजांची राज्यपद्धती जाणून घेतल्यास धार्मिक प्रशासनाच्या माध्यमातून न्याय्य व समाजाभिमुख व्यवस्था प्रस्थापित करता येते.
 
छत्रपती शिवाजी महाराज हे ’रयत म्हणजे जनतेचा राजा’ ही पदवी धारण करणारे पहिले राजे होते. ते नेहमी म्हणायचे, “हे राज्य जनतेने जनतेसाठी निर्माण केले आहे.” जनतेचा पैसा सार्वजनिक कामांवर खर्च करण्याची व्यवस्था त्यांनी राबवली. त्यामुळे तिजोरीच्या जागी त्यांनी विश्वस्त व्यवस्था सुरू केली. त्यांची ही भावना राज्यकारभारात गुंतलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात होती. दि. ३ एप्रिल, १६८० रोजी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या प्रेरणेने मराठा साम्राज्याचा विस्तार महाराष्ट्राच्या पलीकडे अटक ते कटकपर्यंत झाला. त्यांचे हिंदवी स्वराज्य आजही प्रत्येक नागरिकाच्या मनात जीवंत आहे.
 
वैभव डांगे
(लेखक दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)

Powered By Sangraha 9.0