मुंबई : स्वत:ची माणसं बोलवून स्वत:चा जयजयकार करणं म्हणजे पत्रकार परिषद नाही, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निर्णयानंतर उबाठा गटाने पत्रकार परिषद आयोजित केली आहे. दरम्यान, संजय शिरसाटांनी यावर टीका करत पत्रकार परिषदेची स्क्रिप्ट आधीच ठरली असल्याचे म्हटले आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, "महाराष्ट्रात कधीही न घडलेला कार्यक्रम आज आपल्याला पाहायला मिळणार असून याचे दिग्दर्शक संजय राऊत आहेत. संजय राऊतांच्या गळ्यात आज भगव्या रंगांचं उपरणं असेल. तिथे मोठी पत्रकार परिषद होणार असून 'मेरी आवाज सुनो पार्ट टू' दाखवला जाणार आहे."
"आम्हाला निवडणुक आयोगात न्याय मिळाला नाही, विधासभा अध्यक्षांनीही न्याय दिला नाही आणि सर्वोच्च न्यायलय न्याय देणार की नाही याबद्दल शंका आहे. त्यामुळे हा इव्हेंट करुन लोकांच्या घरोघरी ती चर्चा व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. देशातील जनतेने मोदीजींना काम करण्यासाठी निवडून दिलेले आहे. परंतू, ते लोकं जसे रोज सकाळी दहा वाजता उठून पत्रकार परिषद घेतात तशीच मोदीजींनीही घ्यावी असं या रिकामटेकड्यांना वाटतं," असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "एकीकडे तुम्ही लोकशाहीचा आदर करत आहात. परंतू, हम करेंगे सो कायदा ही भुमिका घेण्याचा त्यांनी प्रयत्न सुरु केला आहे. ती लोकांना मान्य नाही. तसेच आम्ही जनतेच्या दरबारात जाणार आहोत असं ते म्हणणार आहेत. मग सुप्रीम कोर्टाची याचिका मागे घ्या. ते लोकं दोन्ही बाजूंनी डमरु वाजवत आहेत. स्वत:चेच माणसं बोलवून स्वत:चा जयजयकार करणं याला पत्रकार परिषद म्हणत नाही. यांचं सगळं ठरलेलं आहे. कुणाची एन्ट्री केव्हा होईल, कोण कधी घोषणा देईल, कुणाच्या विरोधात किती घोषणा द्यायच्या, आगे बढो हा नारा कधी लावायचा हे सगळं ठरलेलं आहे," असेही ते म्हणाले.