नवी दिल्ली : देशातील बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेऊन पळालेले उद्योगपती नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि संजय भंडारी यांना वापस आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योगपतींना भारतात आणण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग, अंमलबजावणी संचालनालय आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांचे उच्चस्तरीय पथक ब्रिटनला जाणार आहे.
एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, संरक्षण व्यापारी संजय भंडारी, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्यासह भारतातील फरारी व्यावसायिकांच्या प्रत्यार्पणाला गती देण्यासाठी तपास यंत्रणांचे एक पथक लवकरच ब्रिटनला रवाना होणार आहे. या तिघांमधील नीरव मोदी आणि विजय मल्ल्यावर बँकांना फसवून कोट्यावधीचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. तर, संजय भंडारीवर काँग्रेस सरकारच्या काळात देशाच्या संरक्षण सामग्री खरेदीत दलालीतून पैसे कमावल्याचा आरोप आहे. संजय भंडारीचे नाव रॉबर्ट वाड्रा आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत सुद्धा जोडण्यात आलेले आहे.