महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे ४१ वे राज्यस्तरीय कृतीसत्र पनवेलमध्ये!

16 Jan 2024 13:39:13

Anil Bornare


मुंबई :
राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये मराठी विषयाचे अध्यापन करणाऱ्या व शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्यासाठी महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ मागील ४० वर्षांपासून दरवर्षी राज्यस्तरीय वार्षिक शैक्षणिक कृतिसत्र भरवत असते. यंदाचे ४१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक कृतिसत्र शनिवार दि. २० व रविवार दि २१ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये सुधागड एज्युकेशन सोसायटीचे के. आ. बांठीया माध्यमिक विद्यालय व एन. एन. उच्चमाध्यमिक विद्यालय, नवीन पनवेल, जि. रायगड येथे संपन्न होणार असल्याचे संघाचे उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले.
 
महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ हा मराठी विषयाच्या विस्तारासाठी व विकासासाठी बांधीलकी असणारा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शासनाने घेतलेल्या उपक्रमांना सदैव सहकार्य करत असतो. ह्या ४१ व्या राज्यस्तरीय कृतिसत्रामध्ये शोधनिबंध सादर केले जाणार आहेत. त्यामध्ये पुढील शोधनिबंधांचे सादरीकरण होणार आहेत.
१) मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकांच्या अध्यापनासाठी संदर्भ ग्रंथांचे वाचन आवश्यक आहे. माझे काही विचार. 
२) इ. ५ वी ते ८वीच्या प्रथम भाषा मराठीच्या पाठ्यपुस्तकांतील गद्यपाठांतून विद्यार्थ्यांचा होणारा विकास: एक अभ्यास.
 
त्याचबरोबर शिक्षकांचे गटकार्यही घेतले जाणार आहे. त्याचे घटक पुढीलप्रमाणे आहेत.
१) लेखनकौशल्य (निबंधलेखन) २) बातमी लेखन ३) पत्र लेखन ४) जाहिरात लेखन.
 
अध्ययन व अध्यापनात सुधारणा करून आपले अध्यापन आनंददायी कसे करता येईल यासाठी राज्यभरातील मराठी विषय शिक्षक एकत्र येऊन चर्चा करतात. या राज्यस्तरीय कृतीसत्राचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक व मराठी अध्यापक शंकर लावंड यांची निवड महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाने केली आहे तर कृतीसत्राचे स्वागताध्यक्ष के.आ. बांठिया माध्यमिक शाळेचे प्राचार्य भगवान माळी आहेत. राज्यातील शेकडो मराठी विषय शिकविणारे सभासद असलेला महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ मागील ४० वर्षांपासून शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी झटतोय. शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, अभ्यासक्रमावर आधारित विविध विशेषांक प्रकाशित करणे, अभ्यासक्रम तयार करण्यासाठी एसएससी बोर्डाला मदत करणे ह्या हेतूने संघाची स्थापना झाली. आज संपूर्ण राज्यभरातील मराठी विषय शिकविणारे शिक्षक या संघाचे सभासद आहेत.
 
शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो. शिक्षण विषयक कुठल्याही योजनेच्या केंद्रस्थानी शिक्षकच असतो. कोणतीही शिक्षण योजना शिक्षकाशिवाय राबविली जाऊ शकत नाही म्हणून शिक्षणाशी संबंधित सर्व विषयावर त्याचे सखोल चिंतन हवे. त्यासाठी भरपूर वाचन, भरपूर श्रवण करायला हवे. आपल्या दैनंदिन अध्यापनात त्याचा वापर करावा या हेतूने मागील ४० वर्षांपासून सुरू असलेल्या या कृत्रीसत्रात प्रत्येक मराठी विषय शिक्षकाने सहभागी व्हायला हवं असं आवाहन महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विजयकुमार लांडगे यांनी केलं आहे.
 
"दरवर्षी होणारे राज्यस्तरीय कृतिसत्र म्हणजे मराठी विषय शिक्षकांसाठी बौद्धिक खुराकच असतो. त्यामुळे या राज्यस्तरीय कृतिसत्रास राज्यभरातून शिक्षक आपली उपस्थिती दर्शवितात. मागील ४० वर्षात ४० कृतिसत्र संपन्न झाले असून या कृतिसत्रात आतापर्यंत १५० हुन अधिक शोध निबंध शिक्षकांनी सादर केले आहेत. मराठी विषय शिक्षकांनी आपल्या विषयात अपडेट होण्यासाठी या कृतीसत्रात सहभागी व्हायला हवं," असं आवाहन महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केलं आहे.

Powered By Sangraha 9.0