मुंबई : देशात सध्या भारत विरुद्ध मालदीव वाद पेटलेला पाहायला मिळत आहे. मालदीवच्या मंत्र्यांनी भारताच्या आत्मनिर्भरतेवर केलेल्या टीकेनंतर हिंदी चित्रपटसृष्टीतूनही चित्रिकरण बंद करण्याचे आवाहन केले जात आहे. आत्तापर्यंत अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान, श्रद्धा कपूर, रणवीर सिंग सारख्या अनेक कलाकारांनी मालदीववर टीका करत तेथे चित्रपटाचे शुटिंग करण्यास नकार दिला असून आता ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) चित्रपट निर्मात्यांना मालदीवमध्ये चित्रपटांचे चित्रिकरण न करण्याचे आवाहन केले आहे.
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने अध्यक्ष सुरेश श्यामलाल यांनी एका व्हिडिओद्वारे म्हटले आहे की, “काही दिवसांपूर्वी मालदीवच्या मंत्र्यानी भारताविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भारत विरुद्ध मालदीव ट्रेंड सुरु झाला. इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचा अध्यक्ष होण्याच्या नात्याने मी सर्व चित्रपट निर्मात्यांना विनंती करतो की त्यांनी मालदीवला बायकॉट करावं. तिथे कोणत्याही चित्रपटाचे शुटिंग करु नये. तसेच सुट्ट्या घालवण्यासाठीही तिथे जाऊ नये. जो आपल्या विरोधात उभा राहील आपणही त्याच्याविरोधात उभे राहूयात.”
याआधी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने देखील मालदीवमध्ये होणाऱ्या चित्रपटांच्या चित्रिकरणाला विरोध करत भारतातील पर्यायी ठिकाणे शोधून तेथे चित्रिकरण करण्याचे आवाहन केले होते.